अकोला : रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या विविध ठिकाणावर देशी व विदेशी दारूची अवैधरित्या होम डिलिव्हरी करणारा ऑटो पकडल्यानंतर तो ऑटो सोडून देण्यासाठी तसेच त्यानंतर हा व्यवसाय करू देण्यासाठी सुमारे २७ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या रामदासपेठ पोलिस ठाण्यातील ठाणेदाराचा रायटर गणेश पाटील यास गुरुवारी सायंकाळी अटक करण्यात आली.रामदास पेठ पोलीस पोलिसांनी दारूची अवैधरित्या वाहतूक व विक्री करणारा ऑटो पकडला. त्यानंतर ऑटोसाहित दारूचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. ऑटो चालक, ऑटो व मुद्देमाल सोडून देण्यासाठी रामदासपेठ पोलिस ठाण्यात पोलीस निरीक्षक यांचा रायटर असलेला गणेश रामराव पाटील याने २७ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली; मात्र चालकास लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून २७ हजार रूपयांची लाच घेताना गणेश पाटील यास रंगेहाथ अटक केली. त्याच्याविरुद्ध रामदासपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख शरद मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या लाचखोरी प्रकरणात अकोला एसीबीने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भूमिका तपासण्यात येत आहे. पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका रायटरने सुमारे २७ हजार रुपयांची लाच मागने ही मोठी रक्कम आहे. त्यामुळे या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका काय आहे. याचाही शोध आता अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरू केला आहे.