मुंबई – रेल्वे सुरक्षा दलाताली एका जवानाने सोमवारी पालघर रेल्वे स्टेशनजवळ एका ट्रेनमध्ये ४ लोकांना गोळी मारून ठार केले. ऑटोमॅटिक हत्यारेने जवानाने फायरिंग केली. ही ट्रेन जयपूरहून मुंबईच्या दिशेने येत होती. मुंबईपासून १०० किमी अंतरावर पालघरमध्ये ही घटना घडली. पालघर रेल्वे स्टेशन ओलांडल्यानंतर आरपीएफ जवानाने चालत्या ट्रेनमध्ये बोगी नंबर ४ आणि ५ मध्ये फायरिंग केली. त्यात आरपीएफ एएसआय आणि अन्य ३ प्रवाशांना गोळ्या लागल्या. त्यानंतर साखळी खेचून बोरिवली स्टेशनजवळ त्याने उडी घेऊन पळण्याचा प्रयत्न केला परंतु जीआरपीने आरोपी आरपीएफ जवानाला हत्यारासह ताब्यात घेतले.
प्रवाशांनी सांगितला ‘तो’ थरारक प्रसंग
या घटनेवेळी ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सांगितले की, सुरुवातीला आम्हाला काहीच समजले नाही. ट्रेनमध्ये अचानक गोळीबार होऊ लागला. सर्वत्र गोंधळ उडाला. प्रवाशी ट्रेनच्या बोगीमधून इकडून तिकडे सैरावैरा पळू लागले. काही प्रवाशांनी त्यांच्या मुलांना लपवले तर काहींनी सामान घेऊन पळ काढला. एका प्रवाशाने म्हटलं की, जेव्हा फायरिंग झाली तेव्हा मी झोपलो होतो. अचानक गोळीचा आवाज आल्यानंतर मी घाबरलो. सुरुवातीला ट्रेनचा अपघात झाल्याचे वाटले. परंतु जेव्हा डोळे उघडले तेव्हा समोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह दिसले. मी घाबरलेल्या अवस्थेत होतो असं त्यांनी म्हटलं.
तर अचानक ट्रेनमधील प्रवाशांवर गोळीबार झाल्याने सर्वच प्रवाशी दहशतीत आले. हा दहशतवादी हल्ला असल्याचे वाटले. हातात हत्यार घेऊन आरोपी गोळी चालवत होता. अनेकजण डब्यातून पळत होती. इतर बोगींमध्ये गोंधळ उडाला. गोळ्या लागलेले व्यक्ती खाली पडले होते असं एका प्रवाशाने सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या ही ट्रेन मुंबई सेंट्रल स्थानकावर आली असून पोलीस पुढील तपास करत आहे. पोलिसांनी चारही मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवले. आरोपी आरपीएफ जवानाची बोरिवली पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे.
काही प्रवाशांनी मारल्या ट्रेनमधून उड्या
गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर प्रवासी इतके घाबरले होते की, त्यांना काहीच समजत नव्हते. बोरिवलीजवळ ट्रेनचा वेग कमी झाला तेव्हा काही प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या घेतल्या. त्यामुळे काही प्रवासी जखमीही झाले. महिला प्रवासी मुलांना घेऊन पळाल्या. आरोपीची पोलीस चौकशी करत असून नेमकी ही घटना का घडली याचा शोध पोलीस घेत असल्याचे पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ सुमित ठाकूर यांनी सांगितले.