मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मशिदीवरील भोंग्यांविरोधातील आंदोलन तीव्र होत चालले असून दिलेल्या अल्टीमेटमला अवघे काही तास शिल्लक असताना आता महाराष्ट्र पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. राज ठाकरे यांच्याविरोधात औरंगाबादेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातच मुंबई पोलिसांनी ८०३ मशिदींना भोंगे लावण्याची परवानगी दिली आहे. ११४४ मशिदींवर भोंगे लावण्यासाठी परवानगी मागणारे अर्ज प्राप्त झाले होते. मात्र, सायलेंट झोनमध्ये असलेल्या मशिदींवर भोंगे लावण्यास मुंबई पोलिसांनी परवानगी दिलेली नाही.
राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टीमेटमला अवघे काही तास शिल्लक असताना मुंबई राज्य पोलीस दल सक्रिय झाल्याचं दिसत आहे. जवळपास १५००० मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटिसा धाडल्या आहेत. तसेच मुंबई बाहेर जाण्याचे आदेश देखील त्यांना देण्यात आले आहे. तसेच महत्वाचे म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेत १२ अटींचे उल्लंघन केल्याने सभेचे आयोजक राजीव जावळीकर आणि राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्तता यांनी सभेला १६ अटी घालून परवानगी दिली होती. सिटी चौक पोलीस ठाण्यात भादंवि कलम ११६, ११७, १५३ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास अधिकारी म्हणून अशोक गिरी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
शेवटची ४ मिनिटं भोवणार, राज ठाकरेंच्या सभेतील 'या' वक्तव्यांवर पोलिसांनी घेतला आक्षेप