मुंबई : साथीदारांच्या मदतीने नोकराने मालकाच्या कार्यालयातील तब्बल सव्वाआठ कोटींच्या सतरा किलो सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ करुन पळ काढला. ही चोरी करताना सीसीटीव्हीमध्ये पाच आरोपी कैद झाले होते. पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू नयेत, यासाठी चोरांनी थेट मोबाईल कॉल न करता हॉटस्पॉटवरून व्हॉट्सॲप कॉलिंगद्वारे कधी वाहनचालकाच्या तर, कधी हॉटेलमधील वेटरच्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधण्याची शक्कल वापरली होती. मात्र, यातील एकाने नातेवाईकाला कॉल केला आणि त्यांचा लपाछपीचा खेळ संपला. पोलिसांनी याच मोबाईल लोकेशनवरून त्यांचा बिकानेर ते इंदौरपर्यंत सुमारे १४ तासांचा अथक पाठलाग करत आरोपींना बेड्या ठोकल्या. या आरोपींनी शेतात लपवलेल्या ९ किलो सोन्यासह एकूण १५ किलोचे दागिने हस्तगत करण्याची कामगिरी पोलिसांनी बजावली आहे.
शेतात पुरले होते सोने :
आरोपी ओला कारद्वारे बोरीवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथून पालनपूरला पोहोचले. तेथून पुन्हा वाहन बदलून त्यांनी रेवधर गाठले. तेथून सिरोही अबू रोड येथील गोशाळेमध्ये दागिन्यांचे वाटप केले. यामध्ये गणेशने स्वतःसाठी ७ किलो साेन्याचे दागिने ठेवले तर प्रजापतीला २ किलो दागिने दिले. तसेच अन्य आरोपींना हातात येईल तसे कमी-जास्त दागिने आणि पैसे देण्यात आले होते. तेथून प्रजापतीने त्याच्या सिरोहीतील पडीक शेतजमिनीत ६ ते ७ फूट खोल खड्डा खणत ते दागिने लपवले व तेथून ते पसार झाले. प्रजापती हाती लागल्यानंतर पथकाने शेतजमिनीतून ९ किलो दागिने हस्तगत केले.
लग्न... बेरोजगारी आणि बरंच काहीएकाच गावातून आलेल्या आरोपींमधील काहीजण लॉकडाऊनमुळे बेरोजगार होते. यातील रमेश प्रजापतीचा नुकताच साखरपुडा झाला होता. लग्नासाठी तजवीज होईल, या आशेने तो यात सहभागी झाल्याचे समोर आले.
प्रदर्शन रद्द झाल्यामुळे हाती लागले घबाडखुशाल टामका यांनी गोरेगाव येथे भरणाऱ्या प्रदर्शनासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात दागिने कार्यालयात आणले होते. मात्र, प्रदर्शन पुढे ढकलल्यामुळे ते सोने कार्यालयात राहिले आणि ठगांनी त्यावर हात साफ केला.
हॉटस्पॉटवरून कॉलिंग
पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू नयेत, म्हणून अटकेतील आरोपी हे हॉटस्पॉटचा आधार घेत व्हॉट्सॲप कॉलिंगवर भर देत होते.