लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : साताऱ्यातील प्रतापसिंहनगरमधील गुंड अजय उर्फ लल्लन जाधव टोळीतील आणि मोक्का केसमधील फरार आरोपीस सातारा शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. ही कारवाई महाबळेश्वरमध्ये करण्यात आली. मच्छिंद्र उर्फ टकल्या भागवत बोराटे (वय ३२, रा. प्रतापसिंहनगर) असे त्याचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार सातारा शहर पोलिस ठाणे हद्दीतील प्रतापसिंहनगरमधील कुख्यात गुंड लल्लन दत्तात्रय जाधव याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर जामिनावर बाहेर आल्यावर त्याने पुन्हा टोळी निर्माण करुन दहशत पसरविली होती. त्यामुळे पोलिसांनी लल्लनसह टोळीतील काही सहकाऱ्यांना जिल्ह्यातून तडीपार केले होते. तीन महिन्यांपूर्वी त्याने टोळीसह प्रतापसिंहनगरमध्ये कोयता घेऊन मारहाण, लुटमार केली. तसेच वाहनांचीही तोडफोड केलेली. हा गंभीर गुन्हा केल्याने पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आॅंचल दलाल, पोलिस उपअधीक्षक राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी शोध घेऊन काही आरोपींना अटक केली होती. मात्र, काहीजण फरार झालेले. आरोपी परजिल्ह्यात गेले होते. त्यामुळे त्यांचा शोध लागत नव्हता. तरीही पोलिसांनी प्रयत्न सुरूच ठेवलेले. शोधादरम्यान तो महाबळेश्वरमध्ये पोलिसांच्या हाती सापडला.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणचे पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार नीलेश यादव, सुजीत भोसले, नीलेश जाधव, पंकज मोहिते, विक्रम माने, सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, तुषार भोसले, सायबर पोलिस ठाण्यातील महेश पवार, ओमकार डुबल, प्रशांत मोरे, यशवंत घाडगे आदींनी कारवाईत सहभाग घेतला.
ओळख लपवून वावर; तरीही सापडला...शहर ठाण्यातील पोलिस शोध घेत असताना आरोपी टकल्या बोराटे हा साताऱ्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेने दोन पथके तयार करुन वाॅच ठेवला. मात्र, टकल्या हा साताऱ्यात न येता पाचगणी, महाबळेश्वर येथे निघून गेल्याची आणि स्वत:ची ओळख लपवून वावरत असल्याची विश्वसनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी माहितीच्या आधारे महाबळेश्वर येथून अटक केली.