लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : एका गुन्ह्याप्रकरणी त्याच्या विरोधात लूक आउट नोटीस जारी होती. त्याचा शोधही सुरू होता आणि अचानक तो इथियोपियावरून मुंबईविमानतळावर दाखल झाला तेव्हा इमिग्रेशनच्या अधिकाऱ्यांना त्याच्या विरोधातील नोटीस लक्षात आल्यामुळे त्याला बाजूला उभे केले. पण तिथून तो कधी गायब झाला, हे अधिकाऱ्यांना समजलेच नाही आणि आता पुन्हा त्याचा शोध सुरू झाला आहे. ही नाट्यमय घटना मुंबई विमानतळावर गुरुवारी घडली.
जहांगीर मोहम्मद हनिफा असे या आरोपीचे नाव असून तो तामिळनाडूचा आहे. त्याच्याविरोधात तामिळनाडूत गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात सर्व विमानतळांवर लूक आउट नोटीस जारी केली. हनिफा मुंबईत उतरला त्यावेळी त्याचा पासपोर्ट तपासल्यावर त्याच्याविरोधात लूक आउट नोटीस असल्याचे निदर्शनास आले. अधिकाऱ्यांनी तामिळनाडू पोलिसांनाही त्याची माहिती दिली. त्याला स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्याची विनंती तामिळनाडू पोलिसांनी केली होती. दरम्यान, विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी हनिफाची अन्य कागदपत्रे तपासण्यासाठी त्याला दुसरीकडे नेले. एका कार्यालयात बसवून संबंधित अधिकारी कागदपत्रांची तपासणीसाठी गेला. तो अधिकारी १२ मिनिटांनी पुन्हा आला त्यावेळी हनिफा गायब झाल्याचे दिसून आले. सहार पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.