जालना : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून करून फरार झालेल्या आरोपीला गोंदी पोलिसांनी श्रीरामपूर येथील त्याच्या बहिणीच्या घरातून शनिवारी रात्री अटक केली. दिलीप गणपत भारस्कर असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव असून, त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती सपोनि. दीपक लंके यांनी दिली.
ज्योती भारस्कर व दिलीप भारस्कर हे दोघे काही दिवसांपासून शहागड येथील डोंगरे वस्तीवरील वीटभट्टी येथे काम करीत होते. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ज्योती भारस्कर व दिलीप भारस्कर या दोघांमध्ये वाद झाला. त्यातूनच दिलीप भारस्कर याने ज्योती भारस्कर यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. त्यात त्यांचा जीव गेला. घटनास्थळावरून आरोपी फरार झाला होता.
पोलिसांचे एक पथक आरोपीच्या मागावर होते. त्याचा शोध घेत असतानाच, संशयित आरोपी हा श्रीरामपूर येथील त्याच्या बहिणीच्या घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून गोंदी पोलिसांचे एक पथक थेट श्रीरामपूर येथे गेले. तेथून आरोपीला अटक केली. त्याला अंबड न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अपर पोलिस अधीक्षक राहुल खाडे, डीवायएसपी सुनील पाटील, सपोनि. सुभाष सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश राऊत, अंमलदार गोपाल दिलवाले, सुशील कारंडे, पठाडे यांनी केली आहे.