भिवंडी - सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृणपणे हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह प्लास्टिकच्या बादलीत कोंबून फरार झालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात भिवंडी शहर पोलिसांना यश आले आहे.
पोलिस पथकाने बिहार राज्यात जाऊन आरोपी सलामत अंसारी (वय ३२) यास अटक केली आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. आरोपी अन्सारी हा भिवंडीत यंत्रमाग कारखान्यात बिगारी काम करीत होता. मृत चिमुरडी चॉकलेट खाण्यासाठी सलामतकडे पैसे मागत होती. त्यावेळी त्याने तिला खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केल्याची माहिती माहिती ढवळे यांनी यावेळी दिली. शहरातील फेणेगाव परिसरातील चाळीतील सहा वर्षीय चिमुरडी १३ सप्टेंबरला हरवली होती. सायंकाळी उशिरापर्यंत ती न मिळाल्याने पालकांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
रात्री उशिरा चिमुरडीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध घेत असताना १५ सप्टेंबरला चिमुरडी राहत असलेल्या परिसरात दुर्गंधी येत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात शोध घेतला. तेथील एका कुलूपबंद खोलीतून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी तपासणी केली असता त्या ठिकाणी अपहरण झालेल्या चिमुरडीचा मृतदेह आढळून आला होता. त्याच खोलीमध्ये मिळालेल्या पुराव्याचे आधारे आरोपीचे नाव सलामत असे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी बिहार राज्यात पळून गेल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आली.
वेशांतर करून पाळत ठेवत आरोपीला अटकघटनेचे गांभीर्य ओळखून अपर पोलिस आयुक्त महेश पाटील, भिवंडी पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहायक पोलिस आयुक्त किशोर खैरनार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतन काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पोलिस पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले होते. पोलिस निरीक्षक विजयकुमार कदम, पोलिस उपनिरीक्षक रवींद्र पाटील, कोलते, पोलिस हवालदार खाडे, राणे, पोलिस शिपाई भांगरे, गावीत, हरणे, ताटे, सोनावणे, कदम, पराड, नंदीवले या पथकाने बिहार राज्यातील मधुबनी जिल्ह्यातील नवादा या गावात वेषांतर करून पाळत ठेवून संशयित सलामत अली आलम अन्सारी यास ताब्यात घेतले. त्याने गुन्हा केल्याचे कबूल केल्याने आरोपीस स्थानिक न्यायालयाच्या परवानगीने भिवंडीत आणून अटक करण्यात आल्याचे ढवळे यांनी सांगितले.