सोलापूर : चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी जिल्हा कारागृहातून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणल्यानंतर बाथरुमची काच फोडून पळाला. सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास ही घटना घडली. तातडीने पोलिसांनी सापळा लावून पहाटे तीनच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले. संदीप रोहिदास धोत्रे (वय- १९, रा. कुर्डू, ता. माढा) असे पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी संदीप विरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या तो जिल्हा कारागृहात होता. त्याची प्रकृती ठीक नसल्याने त्यास उपचाराकरिता शासकीय रुग्णालयातील ए ब्लॉक मध्ये दाखल करण्यात आले होते.
रविवारी १८ जूनच्या मध्यरात्री दोन वाजता तो रुग्णालयातील बाथरूममध्ये गेला होता. त्यादरम्यान त्याने बाथरूमची काच फोडून बाहेर पडला. त्यावेळी त्याच्या बंदोबस्तासाठी पोलीस बाथरूमच्या बाहेरच उभे होते. बराच वेळ झाल्यानंतरही आरोपी संदीप बाथरूमच्या बाहेर आला नसल्याने संशय निर्माण झाला. त्यावेळी पोलिसांनी बाथरूम दरवाजा ढकलून पाहिले असता, आरोपी बाथरूममध्ये नसल्याचे दिसून आले.
तातडीने पोलिसांनी सदर बाजार पोलीस ठाण्याला खबर दिली. त्यानंतर पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू असतानाच, डफरीन चौक ते पार्क चौक दरम्यान मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास आरोपी संदीप पोलिसांना मिळून आला. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. पुढील तपास हवालदार पलपल्ली करीत आहेत.