मंगेश कराळे
नालासोपारा:- तरुणाच्या हत्येच्या गुन्ह्यातील ६ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात तुळींज गुन्हे प्रकटीकरणच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभिजित मडके यांनी शुक्रवारी दिली आहे.
मोरेगावच्या मौर्या नगर येथील नागरिक कॉलनीत राहणाऱ्या प्रवीण उर्फ सोनू साखरिया (२२) याची ३ मे २०१८ रोजी हत्या करण्यात आली होती. त्याची कोणत्यातरी हत्याराने डोक्यात तसेच तोंडावर मारून गंभीर जखमी करत हत्या केलेला मृतदेह ९० फुटी रोडच्या कडेला मिळाला होता. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचे तपासात आरोपी भरत राय (२५), आशिष कुलकर्णी (२१), निशांत मिश्रा ऊर्फ मोनु रायडर (२९) आणि प्रिन्स सिंग ऊर्फ पोगो यांनी केला असल्याचे तपासात निष्पन्न केले होते. या गुन्ह्यात पोलिसांनी भरत, आशिष आणि निशांत या तिघांना तात्काळ अटक केली होती. पण गुन्हा घडल्यापासून आरोपी प्रिन्स हा फरार होता. याचा शोध घेऊन अटक करण्यासाठी वरिष्ठांनी आदेश दिले होते.
तेव्हापासून पाहिजे आरोपी हा त्याचे अस्तित्व लपवून विरार, अंबरनाथ, उल्हासनगर, ठाणे, नवी मुंबई येथे वास्तव्य करत असल्याचे बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली होती. या आरोपीचा माग काढत असताना गुरुवारी संध्याकाळी विरार कातकरी पाडा येथे असल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवानंद सुतनासे यांना मिळाली होती. वरिष्ठांना माहिती देऊन सदर ठिकाणी तुळींज गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून आरोपी प्रिन्सला ताब्यात घेतले. या गुन्ह्यात त्याचा सहभाग निष्पन्न झाल्यावर शुक्रवारी आरोपीला अटक केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील, तुळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि सुनील पाटील, सपोउनिरी शिवानंद सुतनासे, पोलीस हवालदार आनंद मोरे, उमेश वरठा, राजेंद्र जाधव, अशपाक जमादार, पांडुरंग केंद्रे, इस्माईल छपरीबन, राहुल कदम, शशिकांत पोटे, बागुल, अमोल बर्डे यांनी केली आहे.