नालासोपारा : विरारमध्ये गाजलेले समय चव्हाण हत्याकांडाशी लागेबंध आणि कुख्यात गँगस्टार सुभाषसिंग ठाकुरच्या खास हस्तकाला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या टीमने बिहारच्या कटीहार जिल्ह्यातील एका छोट्याश्या गावातून पकडण्यात यश मिळाले आहे. सुभाषसिंगचा उजवा हात मानल्या जाणाऱ्या अखिलेश उर्फ राजू तिवारी (५०) या आरोपीला अटक झाल्यानंतर गुन्हेगार विश्वात खळबळ माजली आहे. सध्या या आरोपीला मोक्याच्या गुन्ह्यात अटक केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहे.
२६ फेब्रुवारीला दिवसाढवळ्या मनवेलपाडा येथील मुख्य रस्त्यावर गोळ्या घालून समय चौहान (३२) याची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हे शाखेने १० आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी या आरोपींची संघटीत टोळी मोडून काढण्यासाठी मुख्य आरोपी गॅंगस्टर सुभाषसिंग ठाकूरवर मोक्का अंतर्गत कारवाई करत दोषारोप पत्र वसई न्यायालयात दाखल केले होते. या हत्याकांडात राहुल शर्मा, अभिषेक सिंग, अर्जुन सिंग आणि मयत मनीष सिंग या शूटरांना समयच्या हत्येसाठी गुन्हा करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली असल्याचे सूत्रांकडून कळते. सुभाषसिंग हा जेलमध्ये असल्यापासून ओळख असणाऱ्या अखिलेश याने एका गुन्ह्यात नऊ वर्षे शिक्षा भोगून जेलमधून बाहेर आल्यावर सुभाषसिंगचे साम्राज्य सांभाळण्यासाठी सुरुवात केली. तेव्हापासून शूटर, खंडणी बाहेरील व्यवहार तोच सांभाळत होता पण कधीही कोणत्याही पोलिसांच्या हाती सापडला नाही.
समय चव्हाण याची हत्या झाल्यावर याचे नाव निष्पन्न झाले होते पण तो पोलिसांना सापडत नव्हता. तो त्याच्या मूळ यूपी राज्यात न राहता बिहार ते नेपाळ असे राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना मिळाली. तसेच तो बिहारच्या कटिहार जिह्यातील एका छोट्याशा गावात राहत असल्याची गुप्त माहिती युनिट तीनचे पोलीस पथकाला मिळल्यावर त्यांची टीम घेऊन त्याठिकाणी पोहचले. १४ जुलैला अखिलेश उर्फ राजू तिवारीला ताब्यात घेऊन ट्रान्झिट रिमांड घेऊन शनिवारी रात्री वसईत आणले. रविवारी वसई न्यायालयात हजर केल्यावर आरोपीला १ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी असल्याचे पोलीस निरीक्षक बडाख यांनी लोकमतला सांगितले. मिरा रोड येथील बंटी प्रधान या हत्येशी याचे काही सूत जुळते का याचा पोलीस शोध घेत आहे.
कोण आहे अखिलेश उर्फ राजू तिवारी?
अखिलेश तिवारी हा पूर्वश्रमीचा यूपी पोलीस दलात होता. त्याच्या वादग्रस्त भूमिकेमुळे २ वेळा बरखास्त आणि ३ वेळा निलंबित होता. एका मोठ्या व्यापाऱ्याच्या अपहरण गुन्ह्यात त्याला अटक केल्यानंतर साबरमती जेलमध्ये ९ वर्षे सजा भोगली आहे. त्याचवेळी जेलमध्ये सुभाषसिंग ठाकूर याची ओळख झाली. जेलमधून सुटल्यावर त्याने सुभाषसिंग याचे साम्राज्य सांभाळण्यास सुरुवात केली. सुभाषसिंगच्या गुन्हेगारी जगताशी सर्व घडामोडींवर तो लक्ष्य ठेवून त्याला चालना देत होता.