मुंबई : दिल्लीच्या अमली पदार्थ विरोधी शाखेचा सहायक आयुक्त ब्रीज पाल, त्याचा पोलीस निरीक्षक दुष्यंत गौतम आणि विनोद सप्रा नावाच्या खबऱ्यामधला हा संवाद आहे. मात्र, हा संवाद रेडिओवरच्या गाण्याच्या आवाजाच्या अनुषंगाने असला, तरी त्यात २० वरून १० वर आलेले आणि नंतर १५ वर स्थिरावलेले आकडे हे लाचेची रक्कम ठरविणारे आहेत...पण ब्रीजपालचे हे सारे संभाषण आता रेकॉर्ड झाले असून, ते सीबीआयच्या ताब्यात आहे आणि त्या अनुषंगाने सहायक पोलीस आयुक्त असलेल्या ब्रीज पाल आणि पोलीस निरीक्षक दुष्यंत यांच्यावर सीबीआयने अटकेची कारवाई केली आहे.
या प्रकरणी सीबीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सहायक पोलीस आयुक्त असलेल्या ब्रीज पाल नावाच्या अधिकाऱ्यासाठी विनोद कुमार सप्रा नावाची व्यक्ती दहा वर्षांपूर्वी खबऱ्याचे काम करायची. त्यावेळी अनेक वेळा ब्रीज पालला त्याने माहिती दिली, पण काही कालावधीनंतर सप्राने माहिती देऊनही ब्रीज पालने त्याला पैसे देणे बंद केले.
पैसे मिळत नाहीत म्हटल्यावर, सप्रानेही ब्रीज पालला माहिती देणे बंद केले. याचा राग ब्रीज पालच्या मनात होता. त्यानंतर, अलीकडेच ज्यावेळी ब्रीज पालचे पोस्टिंग दिल्लीच्या अमली पदार्थ विरोधी पथकात झाले.
त्यानंतर, त्याने पुन्हा एकदा या प्रकरणी तक्रारदार असलेल्या विनोद सप्राशी संपर्क साधला आणि त्याच्याकडे ५० लाख रुपयांची मागणी केली, तसेच ही रक्कम न दिल्यास त्याच्या पत्नीला अमली पदार्थांसंबंधित केसमध्ये अडकविण्याची धमकी दिली, तसेच हे पैसे मिळावे, यासाठी ब्रीज पालने त्याच्याकडे काम करणाऱ्या दुष्यंत गौतम या पोलीस उप-निरीक्षकाला सप्रा याच्याकडून वसुली करण्यास सांगितले. यामुळे घाबरलेल्या सप्रा याने थेट सीबीआयच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करत, या सर्व प्रकाराची माहिती दिली.
सहायक पोलीस आयुक्तानेच अशी मागितली लाच -- सहायक पोलीस आयुक्त साहेब : दुष्यंत (पोलीस निरिक्षक), आवाज वाढव रेडिओचा जरा...- दुष्यंत : साहेब बास का?- साहेब : नाही, आणखी थोडा वाढव... हा २० वर ठेव...- साहेब : ए बघ रे, (सप्रा नावाच्या व्यक्तीला)- सप्रा : साहेब, आवाज फार आहे, कमी करा.- साहेब : कमी नाही होणार.- सप्रा : साहेब, हा आवाज फार जास्त आहे, कमी करा, त्रास होतोय, बसणे शक्य नाही इथे...- साहेब : तू कर मग कमी... २० वर गेलेला आवाज मग सप्राने १० वर केला...- साहेब : ए, गप ए, काहीच ऐकू येत नाही. १८ वर कर रे आवाज दुष्यंत...- सप्रा : साहेब, काहीच कमी झाला नाही आवाज.- दुष्यंत : मला माहितीये साहेबांना त्रास होणार नाही आणि तुलाही त्रास होणार नाही, मी आवाज कमी करतो. (दुष्यंतने रेडिओचा आवाज १५ वर केला) - दुष्यंत : ए सप्रा, हा परफेक्ट आवाज आहे. आता गप रहा...
हे सारे रेकाॅर्डिंग करण्यासाठी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सप्रा याच्या हाताच्या दंडाला शर्टाच्या आतील बाजूला सेलोटेपने डिजिटल रेकाॅर्डर चिकटविला.
गाडीतली ही मीटिंग झाली आणि मग सप्रा परत घरी आले. पण घरी कुणीच नव्हते. त्यांनी पत्नीला फोन केला तेव्हा पत्नी सीबीआयच्या अधिकाऱ्यांसोबत रोहिणी नावाच्या परिसरात गाडीत होती.
असा रचला सापळा -- सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला आणि दुष्यंत कुमार याने सप्रासोबत केलेल्या सर्व संभाषणाचे रेकॉर्डिंग केले.- दुष्यंत कुमार याने या वसुलीसाठी सप्रा याला २० पेक्षा जास्त कॉल केले, त्या सर्व कॉलचे संभाषण आता सीबीआयच्या ताब्यात आहे. - हा सर्व पुरावा हाती आल्यानंतर सीबीआयने ब्रीज पाल आणि दुष्यंत कुमार यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे.