खामगाव : येथील फरशी वरून एका दुचाकीच्या डिक्कीतून चोरी केलेली रक्कम चोरट्याने चक्क पानट गल्लीतील एका पडक्या घरात लपविली होती. दुपारी चोरी केलेली रक्कम रात्री घेण्यासाठी आलेल्या चोरट्याला रात्री दहा वाजता पकडले. यावेळी त्याच्याकडून रक्कम घेतल्यानंतर चोरट्याने संबंधिताच्या हाताला हिसका देऊन पळ काढल्याची माहिती समोर येत आहे.
नटराज गार्डनजवळील पवन शर्मा यांनी बँकेतून काढलेली रक्कम दुचाकीच्या डिक्कीत ठेवली. पूजेचे साहित्य आणण्यासाठी ते फरशी येथील एका दुकानावर गेले. दरम्यान, चोरट्याने दुचाकीच्या डिक्कीतून ८५ हजार लांबविले. ही घटना काही नागरिकांच्या निदर्शनास आली. त्यांनी चोरट्याचा पाठलाग सुरू केला. त्यावेळी त्याने ३२ हजारांची रक्कम फेकून पलायन केले. पाठलाग करणार्यांचे लक्ष विचलित केले. त्यानंतर ५३ हजारांची उर्वरीत रक्कम एका पडक्या घरात फेकून निघून गेला.
रात्री उशीरा पडक्या घरात फेकलेली रक्कम घेण्यासाठी तो पडक्या घरात आला असता, काही स्थानिकांनी त्याला पकडले. मात्र, त्यांच्या हाताला झटका देत पसार झाला. तत्पूर्वी काहींनी त्याच्या जवळील ५२५०० रुपयांची रक्कम हस्तगत केली. ही रक्कम पवन शर्मा यांच्या ताब्यात देण्यात आली. शर्मा यांनी याची माहिती पोलीसांना दिली. चोरी गेलेल्या ८५ हजारांच्या रक्कमेपैकी ८४ हजार ५०० रुपयांची रक्कम मिळाल्याने पवन शर्मा यांचा जीव भांड्यात पडला. मात्र, घटनाक्रमावरून या चोरीबाबत काही प्रश्नचिन्ह सामान्यांसह पोलीस वतुर्ळात उपस्थित होत असल्याची जोरदार चर्चा शहरात होत आहे.