सचिन कांबळे, पंढरपूर: पंढरपुरातील एका वयोवृद्ध महिलेचे सोमवारी निधन झाले होते. त्यांच्यावर त्याच दिवशी हिंदु स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आले होते. तिसऱ्या दिवशी राख सावडण्याच्या कार्यक्रमासाठी संबंधित नातेवाईक गेले, मात्र त्या ठिकाणी मयत व्यक्तीची राख चोरीला गेली असल्याचे निदर्शनास आले.
नक्की काय घडलं?
पंढरपुरातील उपनगरातील मंगळवेढे नगर परिसरातील रखमाबाई गेना देवकर (वय ९५) यांचे सोमवारी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर सोमवारी अंत्यविधी करण्यात आले.
अंत्यविधीच्या वेळी अंगावर होतं सोनं!
अंत्यविधीचा कार्यक्रम उरकल्यानंतर नातेवाईक आपआपल्या घरी गेले. बुधवारी सकाळी सातच्या आसपास राख सावडण्याच्या कार्यक्रमासाठी पुन्हा देवकर यांचे नातेवाईक स्मशान भूमीत एकत्र आले. मात्र अंतविधी झालेल्या ठिकाणी मयत व्यक्तीची राख आढळून आली नाही. यावेळी त्यांच्या अंगावर अंदाजे एक तोळे सोने होते.
यामुळे दत्ता देवकर, दगडूशेठ घोडके, किरण पवार, महेश धोत्रे, सुधाकर चौगुले, शंकर पवार, मारुती शिंदे, दीपक चव्हाण, राजू जगदाळे, महेश चव्हाण, अण्णा जाधव, दत्ता शिंदे व समाजातील मंडळींनी याबाबत पोलिसांकडे जाऊन तोंडी तक्रार केली आहे.