अकोला : न्यू राधाकिसन प्लॉटमध्ये माहेश्वरी भवनात बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिस मुख्यालयातील पोलिस कर्मचाऱ्याचीच दुचाकी अज्ञात चोरट्यानेचोरून नेल्याची घटना ३१ मे रोजी दुपारी घडली. याप्रकरणात कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस कर्मचारी विष्णू गाेविंदा जाधव(४२) यांच्या तक्रारीनुसार ३१ मे रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास त्यांची ड्युटी न्यू राधाकिसन प्लॉटमधील माहेश्वरी भवनात लागली होती. त्यांनी भवनात दुचाकी ठेवली होती. ही दुचाकी त्यांच्या गोंदिया येथील मित्राची होती. बंदोबस्तावरून आल्यावर दुपारी १२:३० वाजता जागेवर उभी केलेली दुचाकी दिसून आली नाही. या प्रकरणात त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गत काही महिन्यांपासून जिल्ह्यातून दिवसाला किमान तीन दुचाकी चोरीला जात आहेत. दुचाकी चोरीच्या सततच्या घटनांमुळे शहरात दुचाकी चोरणाऱ्यांची टोळी सक्रिय असल्याचे दिसून येते. त्यामुळे पोलिसांनी या टोळीला पकडण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.