पाटणा – बिहारमधील पाटणा येथे सादिसोपूर गावात एक अजबगजब घटना पाहायला मिळाली आहे. याठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून कब्रस्तानात १६ दिवसांपूर्वी पुरलेला महिलेचा मृतदेह पुन्हा बाहेर काढण्यात आला आहे. पोलीस आणि प्रशासनाच्या देखरेखीखाली मृतदेह पोस्टमोर्टमसाठी हॉस्पिटलला पाठवला आहे. २८ मार्च रोजी या महिलेची हत्या झाल्याचं आरोप करण्यात आला आहे.
मृत महिलेच्या आईनं मुलीच्या हत्येसाठी जावई मुमताज अंसारीवर मारहाण करत हत्या केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर पटना येथील डीएम डॉ. चंद्रेशखर सिंह यांच्या आदेशावर बिहटा पोलीस आणि तहसिलदारांच्या उपस्थितीत गावातील दफनभूमीतून महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी हा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी दानापूर हॉस्पिटलला पाठवला आहे. मृतदेह बाहेर काढतेवेळी चहुबाजूने गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. घटनास्थळी सध्या मोठ्या संख्येने पोलीस जवान तैनात करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा तपास करणारे एसआय महेश कुमार यांनी सांगितले की, २८ मार्च रोजी सदीसोपूर पोलीस ठाण्यात मुस्लिम महिलेच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तपासादरम्यान शवविच्छेदनासाठी पाटणा जिल्हा अधिकाऱ्याच्या सूचनेनुसार पोलीस आणि प्रशासनाच्या उपस्थितीत मृतदेह कबरीतून बाहेर काढण्यात आला. सध्या मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. या संदर्भात बिहटा सर्कल ऑफिसर कन्हैया लाल यांनी सांगितले की, जिल्हा दंडाधिकार्यांच्या आदेशानुसार महिलेच्या हत्येप्रकरणी सदीसोपूर गावातील दफनभूमीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याची काळजी घेण्यात आली असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
झारखंडच्या बोकारो जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या शबरा खातून यांनी २०१३ मध्ये त्यांची मुलगी सबिना खातून हिचा विवाह सदीसोपूर गावातील रहिवासी मोहम्मद मुमताज अन्सारीशी मोठ्या थाटामाटात केला. लग्नाच्या काही महिन्यांनंतर सासरच्यांनी सबिना खातूनला पैशाच्या कारणावरून मारहाण करण्यास सुरुवात केली. यावर्षी २८ मार्च रोजी अचानक सासरच्या मंडळींकडून तिच्या मृत्यूची माहिती कुटुंबीयांना मिळाली. मामाचे नातेवाईक पोहोचेपर्यंत सबीनाचा मृतदेह कबरीत पुरला होता. यावरून मृत महिलेच्या आईने सासरच्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. पण सुनावणी न झाल्याने मृताच्या आईने डीएम-एसपीकडे तक्रार केली. त्यानंतर आज मृतदेह कबरीतून बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.