Salil Kapoor death reasons : ॲटलस सायकल्सचे माजी अध्यक्ष सलिल कपूर यांनी वयाच्या ७० व्या वर्षी गोळ्या झाडून आयुष्य संपवले. सलिल कपूर यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या मॅनजरने बंगल्यातील मंदिरासमोर रक्ताच्या थारोळ्यात सलिल कपूर यांचा मृतदेह पडलेला बघितला आणि पोलिसांना कळवले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर झाडाझडती घेतली असता सुसाईड नोट सापडली असून, त्यात चार जणांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सलिल कपूर दिल्लीतील डॉ. एपीजे अब्दुल कलाम रोडवर असलेल्या त्यांच्या तीन मजली बंगल्यात होते. त्यात मंदिरही आहे. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मॅनेजरला तळमजल्यावरील मंदिरासमोर सलिल कपूर यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सलिल कपूर यांना तातडीने एम्स रुग्णालयात दाखल केले. तिथे तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलीस आणि फॉरेन्सिक टीमच्या अधिकाऱ्यांनी घटनस्थळावरून हाताचे ठसे जप्त केले असून, त्यावरूनही तपास केला जाणार आहे.
सलिल कपूरांनी आत्महत्या केल्याबद्दल संशय
पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळावरून कपूर यांनी लायसन्स असलेली बंदूक मिळाली आहे. नवी दिल्लीचे डीसीपी देवेश महला म्हणाले की, "सलिल कपूर यांनी स्वतः डोक्यात गोळी झाडून घेतली, याबद्दल संशय आहे. एक सुसाईड नोट घटनास्थळी सापडली असून त्यात चार लोकांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे."
'चार लोकांकडून मानसिक आणि शारीरिक छळ', सुसाईड नोटमध्ये काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सलिल कपूर हे आर्थिक संकटात होते. सुसाईड नोटमध्ये सलिल कपूर यांनी म्हटले आहे की, आर्थिक संकटात होतो. चार लोकांकडून कर्ज घेतले होते. ते फेडण्यासाठी ते धडपड करत होते. चार लोकांनी कर्जाची परतफेड करण्यासाठी मला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. आरोपी कॉल करून धमक्या देत होते. त्यामुळे मी त्रस्त झालो.
सलिल कपूर यांच्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेले ते चार लोक कोण आहेत, याची माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. ज्या चार लोकांचा उल्लेख आहे, त्यांची चौकशी करण्यासाठी माहिती गोळा करत आहोत, असे पोलिसांनी सांगितले.