लखनौ - लग्नात विघ्न येण्याच्या अनेक घटना सध्याच्या लगीनसराईच्या दिवसांमध्ये घडत आहेत. दरम्यान, असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये वधू हातांना मेहंदी लावून वराची वाट पाहत राहिली मात्र नवरदेव वऱ्हाडी मंडळींसह फरार झाला. त्यामुळे लग्नानंतर सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या वधूच्या स्वप्नावर क्षणार्धात पाणी फिरले. या संपूर्ण प्रकरणामागे मद्यपान असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पलाई कल्याणपूर गावातील एक तरुणीचा विवाह बिहरा गावातील जय गोविंद याच्याशी निश्चित झाला होता. घरामध्ये आनंदी वातावरण होते. तसेच रात्री येणाऱ्या वरातीची वाट सर्वजण पाहत होते. त्याची पूर्ण तयारीही करण्यात आली. ठरल्याप्रमाणे रात्री वरात आली. मात्र लग्न होऊ शकलं नाही. त्यामागचं धक्कादायक कारण समोर आलं आहे.
लग्नासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींमधील काही लोक हे मद्यपान करत होती. ज्यावेळी द्वारपूजा होत होती त्याचवेळी हँडपंपजवळ बसून मद्यपान करत असलेल्या काही तरुणांना तेथील ग्रामस्थांने याबाबत विचारणा केली. त्यावरून बाचाबाची झाली. तसेच त्यातून वाद वाढत गेला. हा विवाद एवढा वाढला की, मद्यपान करत असलेल्या वऱ्हाड्यांनी तिथे असलेल्या एका तरुणाला जबर मारहाण केली. त्यामुळे त्या तरुणाला त्वरित रुग्णालयात नेण्यात आले. तिथेच त्याचा मृत्यू झाला.
सदर तरुणाच्या मृत्यूची माहिती गावात समजली. तेव्हा ग्रामस्थ संतापले. ग्रामस्थ आणि वऱ्हाड्यांमध्ये वाद झाला. परिस्थिती हाणामारीपर्यंत पोहोचली. त्यात दोन्हीकडचे सुमारे १२ जण जखमी झाले. या सर्वांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाद वाढलेला पाहून वर आणि त्याच्या कुटुंबातील लोक घटनास्थळावरून फरार झाले. त्यामुळे लग्नही होऊ शकले नाही. तसेच एका तरुणाचा मृत्यूही झाला.
दरम्यान, तरुणीच्या मृत्यूनंतर गावात शोकाचं वातावरण आहे. तर तरुणीचा विवाह न झाल्याने संपूर्ण गाव दु:खात आहे. यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. तसेच प्रकरणाचा तपास सुरू आहे.