परभणी : तू इथे का आलास असे म्हणून मयताने घटनेपूर्वी भावास विचारले असता किरकोळ वादात मयतास सख्ख्या भावाने गालावर ठोसा मारला तसेच चाकूने, काचेच्या फुटलेल्या ग्लासच्या तुकड्याने, कळशीने मारहाण करीत जखमी केले. यात सख्या भावाचा जागेवर मृत्यू झाला. किरकोळ वादातून झालेली खुनाची घटना शहरातील साई कॉर्नर जवळील मराठवाडा प्लॉट भागात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सकाळी उघडकीस आली.
परभणीतील मराठवाडा प्लॉट परिसरात शनिवारी मध्यरात्री एक ते पहाटे पाचच्या दरम्यान ही खूनाची घटना घडली. रामचंद्र कोंडीबा वाघमारे (वय ४०, रा.पोस्ट कॉलनी, दर्गा रोड, परभणी) यांनी नानलपेठ ठाण्यात फिर्याद दिली आहे. सतीश कोंडीबा वाघमारे (४३, रा.मराठवाडा प्लॉट, साई कॉर्नर) असे घटनेतील मयताचे नाव आहे. तर घटनेतील आरोपी सुनील कोंडीबा वाघमारे (४९, रा.मराठवाडा प्लॉट) हे आहेत. शकुंतलाबाई कोंडीबा वाघमारे (७५) ह्या मराठवाडा प्लॉट भागात राहतात. सुनील व सतीश वाघमारे ही त्यांची दोन मुले. याशिवाय त्यांचा अन्य एक मुलगा रामचंद्र हा पोस्ट कॉलनी भागात राहतो. सुनील आणि सतीश वाघमारे हे आई शकुंतलाबाई यांच्यासमवेत मराठवाडा प्लॉट येथे वास्तव्यास आहेत.
शकुंतलाबाई या गेल्या काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. शनिवारी मध्यरात्री मयत सतीश यांनी भाऊ सुनील यास तू इथे का आलास असे विचारले असता आरोपी सुनील वाघमारे याने भाऊ सतीश यांच्या गालावर ठोसा मारला तसेच चाकूने व फुटलेल्या काचेच्या ग्लासाने व त्याच्या तुकड्याने आणि कळशी मारून सतीश यास गंभीर जखमी केले. यात सतीश यांना रक्तस्त्राव झाला, यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रात्री मयत सतीश यांच्या शेजारीच आरोपी भाऊ सुनील हा बसून होता. ही बाब घराशेजारी राहणारे भाडेकरू, साक्षीदार यांना रविवारी सकाळी समजली. त्यांनी सदरील माहिती नानलपेठ पोलिसांना दिली. पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी, पंचनामा केला. मयत, आरोपी यांचे नातेवाईक आणि अन्य लोकांना घटनास्थळी बोलावले. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी पूर्ण केली.