जालना : गच्चीवर वाळू फेकल्याचा राग मनात धरून भावानेच मुलांच्या मदतीने ६० वर्षीय भावाला शिवीगाळ करून खून केल्याची धक्कादायक घटना बदनापूर तालुक्यातील ढासला येथे बुधवारी उघडकीस आली. मधुकर उमाजी पोपळघट (६०, रा. ढासला, ता. बदनापूर) असे मयताचे नाव आहे.
मधुकर पोपळघट हे मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे घराच्या गच्चीवर झोपण्यासाठी गेले होते. त्याचवेळी त्यांचा नातू गच्चीवर आला. त्याने गच्चीवरील वाळू संशयित आरोपी सुधाकर उमाजी पोपळघट, मनोज सुधाकर पोपळघट, योगेश सुधाकर पोपळघट यांच्या घराच्या गच्चीवर फेकली. गच्चीवर वाळू फेकल्याचा राग मनात धरून संशयित आरोपींनी मधुकर पोपळघट यांना शिवीगाळ केली. त्यांना मारहाण करून खाली पडून ठार केले. मयताचा मुलगा बाळू मधुकर पोपळघट यांना समजल्यानंतर त्यांनी गच्चीवर धाव घेतली. त्याने वडिलांना तातडीने सुरुवातीला लाडसावंगी, नंतर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले.
या प्रकरणी बाळू मधुकर पोपळघट यांच्या फिर्यादीवरून संशयित सुधाकर उमाजी पोपळघट, मनोज सुधाकर पोपळघट, योगेश सुधाकर पोपळघट यांच्याविरुद्ध बदनापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. तर दोघे जण फरार आहेत. घटनास्थळाला डीवायएसपी नीरज राजगुरू, पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलिस उपनिरीक्षक सहाणे यांनी भेट दिली.