ठाणे : ठाण्याचे माजी महापौर गणेश साळवी यांचा मोठा भाऊ बांधकाम व्यावसायिक दिलीप साळवी यांनी पत्नी प्रमिला साळवी हिच्यावर गोळी झाडून तिचा खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री १०.३० ते ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेच्या धक्क्याने त्यांचाही काही अंतराने मृत्यू झाला आहे. ते रक्ताच्या थारोळयात पडल्याने त्यांनीही स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे चित्र सुरुवातीला पोलिसांनाही आढळले होते. मात्र, नंतर केलेल्या तपासणीमध्ये त्यांच्यावर गोळीबार झालेला नसल्याचे कळवा पोलिसांनी सांगगितले.
कळवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप आणि त्यांची पत्नी प्रमिला यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कौटूंबिक वाद सुरु होते. याच वादातून त्यांनी त्यांच्या परवानाधारक र्व्हिाॅल्वरमधून प्रमिला हिच्यावर शुक्रवारी रात्री गोळी झाडून तिचा खून केला. खुनाचे हे थरारनाट्य कळव्यातील मनीषानगरातील कुंभारआळीतील साळवी यांच्या घरात घडले. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.घटनास्थळी ठाण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त महेश पाटील, उपायुक्त गणेश गावडे, सहायक पोलिस आयुक्त विलास शिंदे आणि कळवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात आदींनी भेट देऊन पाहणी केली.
दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच दिलीप यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक थोरात यांनी सांगितले. याप्रकरणी दिलीप यांच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जागेचा आणि घटनेचा पंचनामा पहाटे उशिरापर्यंत करण्यात येत होता. हत्येमागे आणखीही काही कारणे आहेत किंवा कसे याचाही तपास करण्यात येत असल्याचे कळवा पोलिसांनी सांगितले.