दिल्लीच्या कुख्यात गँगस्टर नीरज बवानाच्या नावाने बुलढाणा शहरातील केशव नगर भागातील पंकज अरुण खर्चे कुटुंबाकडे तब्बल ४० लाखांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास 'गेम' करण्याची धमकी देखील देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांत अज्ञात आरोपीविरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाने (डिबी) अवघ्या तीन दिवसांत उपरोक्त गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळविले असून या प्रकरणी पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या साहाय्याने दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
विशेष म्हणजे यातील एक आरोपी हा फिर्यादीचा जवळचा नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी आदित्य सुरेश कोलते ( वय १८) आणि ऋषीकेश अनिल शिंदे (वय १८), अशा दोघा आरोपीचे नाव आहे. तर या दोघा आरोपीतील आदित्य हा फिर्यादीचा खर्चे यांचा जवळचा नातेवाईक आहे. तर दुसरा आरोपी ऋषीकेश शिंदे हा किन्होळा येथील रहिवासी आहेत. दोन्ही आरोपींनी आयटीआय केलेले आहे.
विशेष म्हणजे आरोपी आदित्य हा नेहमी सोशल मिडियावर असायचा. हातबॉम्ब कसे बनवाये, देशात नामवंत गँगस्टर कोण कोण आहेत, विविध गोल्डमॅनला फॉलो करणे, असाच उद्योग करायचा. दरम्यान, खर्चे यांनी पुणे येथे ४० लाख रुपयांचा फ्लॅट घेतला. त्यामुळे त्यांच्याकडे बक्कळ पैसा असल्याची धारना करुन घेत त्यांनाच ब्लॅकमेल कराखा गेम आखला होता.