औरंगाबाद : मुकुंदवाडीतील संजयनगर येथील एका महिलेचा मृत्यू झाला. अंत्यसंस्काराची तयारी सुरु होती. त्याच वेळी दोन बैल उधळले. बैलांनी शिंगांनी अनेकांना भोसकले. यात पाच महिला गंभीर जखमी झाल्या. त्यातील एका वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान घाटीत गुरुवारी मृत्यू झाला. बैल उधळल्याची घटना १८ नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणी मुकुंदवाडीत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी दिली.
मालनबाई भावराव जाधव (६५, रा. काद्राबाद, ता. औरंगाबाद) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजयनगरमध्ये राहणारे ईश्वर भातपुडे यांच्या आईचे १८ नोव्हेंबर रोजी निधन झाले होते. जवळचे नातेवाईक असल्याने मालनबाई कुटुंबासह अंत्यसंस्कारासाठी आल्या होत्या. पार्थिव अंत्यसंस्कासाठी नेण्यासाठी घराबाहेर आणून अंतिम तयारी सुरू होती. त्याच वेळी परिसरात उसळलेले दोन बैल अचानक धावत गर्दीत घुसले व त्यांनी अनेकांना जखमी केले. स्थानिकांनी त्यांना हाकलण्याचा प्रयत्न केल्याने मोठी दुर्घटना टळली. काही महिलांच्या चेहऱ्याला, पायांना गंभीर दुखापत झाली. मालनबाई रक्तबंबाळ झाल्याने त्यांना घाटी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल केले होते. मात्र, गुरुवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. मालनबाई यांच्या पश्चात तीन मुले, दोन सुना असा परिवार आहे.
मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर
शहरात सर्वत्र मोकाट जनावरे, कुत्र्यांचा मुक्त संचार सुरु असतो. दोन दिवसांपूर्वी शहरात तब्बल ९ जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना घडली होती. त्याशिवाय रात्री उशिरा रस्त्यावरुन जाताना कुत्र्याच्या झुंडीच्या झुडी वाहनांवर धावुन येतात. त्याशिवाय जनावरांचाही सर्वत्र सुळसुळाट झाला आहे. त्याविरोधात महापालिका प्रशासन काही करवाई का असा प्रश्न मुकुंदवाडीतील नागरिकांनी उपस्थित केला आहे.