लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासह महानायक अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या निवासस्थानी बॉम्बस्फोट होणार आहेत, अशी माहिती देऊन कॉल कट करणाऱ्या व्यक्तीविरोधात शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने खोटी माहिती दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ मंगळवारी कुर्ल्यातही बॉम्बस्फोटाच्या खोट्या कॉलची भर पडली आहे.
केंद्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुंबईसाठी धोकादायक म्हणून घोषित केलेल्या सरफराज मेमन (४०) याला इंदूरमध्ये ताब्यात घेऊन चाैकशी सुरू असतानाच नागपूर पोलिसांना ११२ क्रमांकावर एका अनोळखी नंबरवरून काॅल आला. काॅल करणाऱ्याने आपले नाव राजेश कडके असे सांगितले. तसेच, त्याने शिवाजी पार्क येथे दिलीप जोशी यांच्या घरासमोर मोठी गर्दी जमली आहे. २५ जणांकडे बंदुका आणि बाॅम्ब आहेत, अशी घटना त्याने फोनवर ऐकली आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासह महानायक अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांची निवासस्थानी बॉम्बस्फोट होणार आहेत, अशी माहिती देऊन त्याने काॅल कट केला.
नागपूर पोलिसांकडून ही माहिती मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला देण्यात आली. त्यानंतर सर्व यंत्रणांना सतर्क झाल्या. पण प्रत्यक्षात ही माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे अफवा पसरवून भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात कार्यरत पोलिस शिपाई भाग्यश्री हत्तीमारे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुर्ल्यात बाॅम्बस्फोट.. :
मंगळवारी मुंबई पोलिसांना ११२ क्रमांकावर अनोळखी नंबरवरून एका व्यक्तीने काॅल केला. त्याने कुर्ला पश्चिम येथे १० मिनिटांत बाॅम्बस्फोट होणार आहे, असे सांगून काॅल कट केला. पोलिसांनी लगेचच त्याला काॅल करण्याचा प्रयत्न केला असता त्याने फोन स्वीच ऑफ केला. त्यानंतर पोलिसांनी विनोबा भावे नगर पोलिसांना याची माहिती दिली. हा कॉलदेखील खोटा असल्याची माहिती समोर आली आहे.