पणजी: आपल्या आय १० कारने पहाटे गिऱ्हायिकाला भेटण्यासाठी म्हापसाहून पर्वरीच्या दिशेने निघालेल्या इसमाला महामार्गावर पोलिसांनी अडविले. त्याच्याकडे गांजा आणि चरस मिळून ५५ लाख रुपये किंमतीचा गांजा सापडला. त्याला अटक करून त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अलिकडच्या काळातील ही सर्वात मोठी पकड ठरली आहे.
अंमली पदार्थ विरोधी विभागाकडून करण्यात आलेल्या या कारवाईत ३० किलो गांजा आणि ५ किलो चरसचा साठा संशयिताजवळ सापडला. त्याची एकूण किंमत ५५ लाख रुपये इतकी होत असल्याचे पोलीस महासंचालक डॉ जसपाल सिंग यांनी दिली आहे. त्याच बरोबर संशयिताची आय १० ही कार आणि ५० हजार रुपयांची रोखडही जप्त करण्यात आली आहे. ही कामगिरी बजावणाऱ्या पोलीस पथकाला पोलीस महासंचालकाने इनामही जाहीर केले आहे.
संशयित महाडेश्वर हा म्हापसा येथील असून त्याच्या कारवायांवर पोलिसांचे लक्ष्य होते. त्याचे आंतरराज्यीय ड्रग्ज तस्करांशी संबंध असून ही टोळी कर्नाटकातून गांजा आणि हिमाचल प्रदेशच्या डोंगराळ भागातून चरस तस्करी करत होता असे तपासा दरम्यान आढळून आले आहे. शनिवारी पहाटे तो ड्रग्ज घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता आणि म्हापसा-पर्वरी महामार्गावर त्याला पकडण्यात ोपोलिसांना यश मिळाले.