उज्जैन - उज्जैनमधील आग्रा रोडवरील टाटा कार शो रूममध्ये मंगळवारी दुपारच्या सुमारास आलेल्या चोरट्यांनी टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने कार पळवली. मात्र कारमधील सेफ्टी फिचरमुळे अर्ध्या वाटेत गेल्यावर कार बंद पडली. त्यामुळे या चोरट्यांना कार तिथेच सोडून पळ काढावा लागला.
ही घटना आग्रा रोडवरील सांघी ब्रदर्स यांच्या शोरूममध्ये घडली. या शोरूममध्ये दोघे जण गाडी खरेदी करण्याची बहाण्याने आले. तसेच त्यांनी शोरूम एझिक्युटिव्हला टाटाच्या अल्ट्रोज कारची टेस्ट ड्राईव्ह दाखवण्यास सांगितले. टेस्ट ड्राईव्हसाठीची सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर आरोपी शोरूमचे एक्झिक्युटिव्ह विष्णू गोयल यांच्यासोबत टेस्ट ड्राईव्हसाठी भैरव गडच्या दिशेने निघाले. काही अंतरावर गेल्यावर गाडी चालवत असलेल्या तरुणाने गाडीत काहीतरी दोष असल्याचे सांगत विष्णू यांना खाली उतरून चेक करण्यास सांगितले. दरम्यान, विष्णू हे खाली उतरताच हे दोघेही बदमाश कार घेऊन फरार झाले.
हा प्रकार पाहून विष्णूला धक्का बसला. त्याने याची माहिती त्वरित शोरूममध्ये दिली. तसेच चिमनगंज मंडी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. या घटनेचा तपास सुरू असताना कुणीतरी ही कार वीरसावरकरनगर येथे उभी असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही कार ताब्यात घेतली. मात्र दोन्ही आरोपी फरार झाले आहे.
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. यामध्ये दोन आरोपी शो रूमची रेकी करताना दिसत आहे. कंपनीच्या विभागीय व्यवस्थापक रागिनी शाही यांनी सांगितले की, आता अनेक कारमध्ये सेफ्टी फीचर असतात. आरोपी कार पुश बटनने स्टार्ट केल्यानंतर घेऊन गेले. त्यानंतर कुठेतरी त्यांनी कार बंद केली असेल. मात्र त्यावेळी कारची सेंसर चावी विष्णू यांच्याकडे असल्याने चोर कार पुन्हा चालू करू शकते नाहीत. त्यामुळे ते कार रस्त्याशेजारी ठेवून पसार झाले.
दरम्यान, चिमनगंज मंडी ठाण्याचे एसआय करण कुंवाल यांनी सांगतले की, चोरी झालेली कार जप्त करण्यात आली आहे. तसेच जे लोक ही कार घेऊन पळाले होते त्यांची नावेही समोर आली आहेत. लवकरच या प्रकरणात पोलीस माहिती उघड करतील.