राजकुमार जाेंधळे, लातूर: कातपूर राेड परिसरात राजकमल अग्रवाल यांच्या बंगल्यावर बुधवारी २.३० ते ३.३० वाजण्याच्या सुमारास पाच जणांनी तब्बल तीन काेटींचा सशस्त्र दराेडा टाकला. या घटनेने लातुरात एकच खळबळ उडाली आहे. दराेडाेखाेरांनी माेठ्या शिताफीने हे घर लुटल्याचे समाेर आले आहे. नियाेजनबद्ध पद्धतीने त्यांनी हा दराेडा टाकला असल्याचे पाेलिसांनी सांगितले. लातूर शहरातील कातपूर राेड परिसरात असलेल्या कन्हैया नगरात व्यापारी राजकमल अ्ग्रवाल यांचा बंगला आहे. बंगल्यात पाठीमागच्या दाराने पाच दराेडेखाेरानी बुधवारी पहाटेच्या सुमारास घरात प्रवेश केला. घराच्या किचनचे दारातून दराेडेखाेर घुसल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा राजकमल अग्रवाल यांना उठवले. पिस्टल, चाकू आणि कत्तीचा धाक दाखवत राेकड, साेन्याचे दागिने काेठे ठेवले आहेत? असे दरडावत विचारणा केली. राेकड माेठी असल्याने ती कशी न्यायची हा प्रश्न दराेडेखाेरांना पडला. त्यांनी घरातच बॅगची शाेधाशाेध केली. दाेन बॅग त्यांच्या हाती लागले. दरम्यान, दाेन बॅगमध्ये त्यांनी तब्बल २ काेटी २५ लाखांची राेकड भरली. साेन्याचे दागिनेही माेठ्या प्रमाणावर असल्याने तेही त्यांनी एका बॅगेत भरले. जवळपास तीन काेटींचा मुद्देमाल त्यांनी तासाभराच्या नाट्यानंतर पहिल्यांदा तिघे घरातून बाहेर पडले. त्यापाठाेपाठ टाेळीतील दाेघे जण पसार झाले.
घाबरुन दिल्या लाॅकरच्या चाव्या...
पाच दराेडेखाेरांनी घरात प्रवेश केल्यानंतर पिस्टल, चाकू आणि कत्तीने त्यांना धमकावले. घाबरलेल्या अग्रवाल यांनी लाॅकरच्या चाव्या दराेडेखाेरांच्या हाती साेपविल्या. त्यानंतर दराेडेखाेरांनी घरातील सव्वा २ काेटी २५ लाखाची राेकड आणि ७३ लाख ९ हजार ५०० रुपयांचे साेन्याचे दागिने लंपास केले. जीवाच्या भीतीने अग्रवाल यांनी दराेडेखाेरांच्या हाती चाव्या दिल्याचेही पाेलिसांनी सांगितले.
सीसीटीव्ही कॅमेरे बंद?
बंगल्यासह परिसरात असलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची माहिती मिळत आहे. ते किती दिवसापासून बंद आहेत, याची स्पष्ट माहिती समाेर आली नाही. याबाबत पाेलीस तपास करत आहेत. बॅगल्यात वाॅचमन हाेता का? याचीही माहिती अद्याप मिळाली नाही. बंगल्याच्या पाठीमागील संरक्षक भिंतीवरुन दराेडेखाेरांनी उड्या मारुन बंगल्यात प्रवेश केला असून, किचनच्या पाठीमागच्या दारातून घरात प्रवेश केला, अशी माहिती अनुराग जैन (अप्पर पाेलीस अधीक्षक) यांनी दिली.