लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मैत्रीण दुसऱ्याबरोबर बोलते या संशयावरून एका कबड्डी प्रशिक्षकाने गळा आवळून आणि गळ्याभोवती कात्रीने भोसकून तिची हत्या केल्याची घटना कापूरबावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात कबड्डी प्रशिक्षक गणेश गंभीरराव (२३) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
कापूरबावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोलशेत भागातील एका चाळीत ही घटना घडली. मृत १७ वर्षीय मुलगी तिच्या आई आणि भावासोबत येथे भाड्याच्या घरात राहत होती. २४ मे रोजी तिच्या घरातून अचानक दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी याबाबतची माहिती घर मालकाला दिली. घरमालकाने दरवाजा उघडला असता, मुलीचा मृतदेह आढळला. त्यावेळेस तिची आई आणि भाऊ घरात नव्हते. त्यानंतर या संदर्भात कापूरबावडी पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदन अहवाल २५ मे रोजी मिळाला. त्यात तिचा मृत्यू हा गळा दाबल्याने आणि गळ्याभोवती जखमा झाल्यानेच झाला असल्याचे स्पष्ट झाले. कापूरबावडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
दोघांमध्ये झाला होता वाद
मृत मुलीला कबड्डी खेळण्याची आवड होती. तिने गणेश याच्याकडे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. यातून त्यांची मैत्री झाली होती. गणेश तिच्यावर प्रेम करत होता. दि. २३ मे रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मुलगी घरात एकटी असताना गणेश तिच्या घरी आला. ती इतर कोणाशी मोबाइलवर बोलते, असा गणेशला संशय होता. या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. यातून त्याने तिचा ओढणीच्या मदतीने गळा आवळला. त्यानंतर तिच्या गळ्याभोवती कात्रीने जखमा केल्या. हत्येनंतर गणेशने बाहेरून दरवाजा ओढून पळ काढल्याचे तपासात निष्पन्न झाले.