लातूर : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त लातूर जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीतील गावामध्ये सुरू असलेल्या अवैध दारू, हातभट्टी अड्ड्यांवर धाडी टाकण्यात आल्या. ही कारवाई लातूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केली आहे. याबाबत ५६ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ५७ जणांना अटक केली आहे. यावेळी एकूण चारचाकी, चार दुचाकीसह ७ लाख २३ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यातील काही गावांमध्ये माेठ्या प्रमाणावर हातभट्टी, अवैध देशी-विदेशी दारू विक्री केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लातूर जिल्हा अधीक्षक केशव राऊत यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त या अवैध दारूविक्रीविराेधात धडक माेहीम हाेती घेतली. यासाठी लातूर आणि उदगीर येथील पथकांची नियुक्ती करण्यात आली हाेती. या पथकाकडून करण्यात आलेल्या कारवाईत ५६ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, ५७ जणांना अटक केली आहे. यावेळी ४४१ लिटर देशी दारू, २७ लिटर विदेशी दारू, २ हजार ४५ लिटर हातभट्टी आणि ३ हजार २५० लिटर रसायन, चार चारचाकी आणि चार दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे.
लातूर, उदगीर येथील पथकाची संयुक्त कारवाई...ही कारवाई लातूर विभागाचे निरीक्षक आर. एस. काेतवाल, आर. एम. चाटे, दुय्यम निरीक्षक एल. बी. माटेकर, ए. के. शिंदे, स्वप्निल काळे, ए. बी. जाधव, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश गाेले, नीलेश गुणाले, मंगेश खारकर तसेच जवान अनिरुद्ध देशपांडे, सुरेश काळे, श्रीकांत साळुंके, ज्याेतीराम पवार, एस. जी. बागेलवाड, संताेष केंद्रे, एकनाथ फडणीस, पुंडलिक खडके, विक्रम परळीकर यांच्या पथकाने केली आहे.