सूरज नाईकपवार, लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव:गोव्याचे महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांच्या विरोधात कथित अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील खटल्यात समन्स बजावूनही न्यायालयात सुनावणीच्या वेळी गैरहजर राहिलेल्या एका साक्षिदाराविरोधात आज बुधवारी न्यायालयाने जामीन पात्र वॉरन्ट जारी केले.
खास न्यायालयाचे न्यायाधीक्ष इर्शाद आगा यांच्या न्यायालयात हा खटला चालू आहे. आज हा खटला सुनावणीस आला. यावेळी या खटल्यातील क्रमांक ४४ या साक्षिदाराची साक्ष न्यायालयात सुनावणीस येणार होती. त्याला समन्सही बजाविण्यात आले होते..ते त्याला मिळालेलही होते. मात्र तो न्यायालयात सुनावणीच्या वेळी गैरहजर राहिला. आता या खटल्याची पुढील सुनावणी बुधवार दि. १३ डिसेंबर रोजी हाेणार आहे.
खटल्याच्या सुनावणीस कायमस्वरुपी अनुपस्थित राहण्याची मुभा मंत्री मोन्सेरात यांना यापुर्वीच न्यायालयाने दिली आहे. अन्य एक संशयित रोझी फेर्राव याही काल खटल्याच्या सुनावणीस गैरहजर होत्या. सरकारी वकील व्ही. जे. कॉस्ता व दोन्हीही संशयितांचे वकील सुनावणीच्या वेळी हजर होते. २००६ सालची ही घटना आहे. उत्तेजक पेय पाजून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप मंत्री मोन्सेरात यांच्यावर आहे.