मुंबई : वडील हे मुलीचे ‘संरक्षक व विश्वस्त’ असतात, असे निरीक्षण नोंदवित विशेष पॉक्सो न्यायालयाने ४० वर्षीय व्यक्तीला स्वत:च्याच पाच वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याबद्दल पाच वर्षांची कारावासाची शिक्षा केली. मुलीवर केलेल्या लैंगिक अत्याचारानंतरही ‘त्वचेला त्वचेचा स्पर्श’ न केल्याचा वडिलांच्या युक्तिवाद ऐकून विशेष न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले.
१२ एप्रिल रोजी विशेष पोक्सो न्यायालयाने स्वत:च्याच पाच वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या वडिलांना पाच वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. आदेशाची प्रत रविवारी उपलब्ध झाली. ‘पाच वर्षीय मुलीने कधीच म्हटले नाही की, तिच्या वडिलांनी तिच्या गुप्तांगाला बोटाने स्पर्श केला... हा युक्तिवाद आश्चर्यकारक आहे,’ असे विशेष न्यायालयाचे न्या. एच. सी. शेंडे यांनी म्हटले. ‘हा युक्तिवाद आश्चर्यचकित करणारा आहे... पोक्सो कायद्याच्या कलम ७ मध्ये लैंगिक शोषणासंदर्भात केलेल्या व्याख्येत देखील आरोपीने पीडितेच्या गुप्तांगाला कसा स्पर्श करावा आणि आरोपीने तसे केल्यास तो किती मोठा गुन्हा असेल, असे कायद्यात नमूद केले नाही,’ असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
या प्रकरणातील आरोपी हा पीडितेचा पिता आहे. त्यामुळे त्याने केलेला दयेचा अर्ज चुकीचा आहे. त्याचा अर्ज दाखल करून घेतला तर ती न्यायाची चेष्टा केल्यासारखे होईल, असे न्यायालयाने म्हटले.
काय झाले न्यायालयात ?- अल्पवयीन मुलीच्या आईने तिच्या नवऱ्याविरोधात पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारीनुसार, २०१९ मध्ये पीडित मुलीच्या शिक्षिकेने मुलगी शाळेत विचित्र वागत असल्याची तक्रार मुलीच्या आईकडे केली. मुलीकडे याबाबत विचारणा केल्यावर तिने वडिलांनी तिच्या गुप्तांगाला स्पर्श केल्याचे आईला सांगितले. - त्यानंतर मुलीच्या आईने वडिलांविरोधात पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी वडिलांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदविला. पत्नीला मला सोडायचे असल्याने तिने नाहक मला या गुन्ह्यात गोवले आहे, असा युक्तिवाद आरोपीने न्यायालयात केला.- मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळला. संपूर्ण खटल्यादरम्यान पीडितेचे एकच म्हणणे होते की, वडिलांनी तिच्या गुप्तांगाला स्पर्श केला. वडिलांनी केवळ तिचे लैंगिक शोषणच केले नाही, तर तिला धमकीही दिली. - तिने याबाबत कोणाला काही सांगितले तर शिक्षा देण्यात येईल, अशी धमकी वडिलांनी मुलीला दिली. या कृत्यावरून आरोपीचे दोषी मन दिसून येते, असे न्यायालयाने म्हटले.
‘पिता मुलीचा ‘संरक्षक व विश्वस्त’‘पिता तिच्या मुलीचा ‘संरक्षक व विश्वस्त’ असतो.. त्यामुळे हे प्रकरण अधिक गंभीर आहे. याप्रकरणी कायद्याने विहित केलेल्या शिक्षेपेक्षा कमी शिक्षा करण्याचे समर्थन करण्यासारखी परिस्थिती दिसत नाही,’ असे न्यायालयाने म्हटले.