उत्तर प्रदेश : वडिलांनी दिलेली साक्ष निर्णायक ठरली आणि चार वर्षांपूर्वी झालेल्या हत्या प्रकरणात तरुणाला न्यायालयाकडूनजन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. ही घटना उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील टिकैतनगर परिसरात बनगांवा इथं घडली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात आरोपीचे वडील हे एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते.
याबाबतची अधिक माहिती अशी की, ऑगस्ट २०१९ मध्ये राम मथुरा बिहारी आणि श्याम मथुरा बिहारी या दोन सख्ख्या भावांमध्ये काही कारणास्तव वाद झाला. या वादाबाबत माहिती मिळताच पोलीस गावात दाखल झाले आणि दोघांनाही समजूत दिल्यानंतर हा वाद मिटला. मात्र श्यामच्या डोक्यातील राग शांत झाला नव्हता. त्याने रात्री एका लोखंडी वस्तूने आपला लहान भाऊ राम याच्या डोक्यात वार करत त्याचा खून केला.
दरम्यान, याप्रकरणी मागील चार वर्षांपासून कोर्टात सुनावणी सुरू होती. लहान मुलाच्या मृत्यूनंतर मथुरा बिहारी या पित्याने कठोर भूमिका घेत मोठा मुलगा श्याम बिहारी याच्याविरोधात साक्ष देण्याचं ठरवलं. विशेष म्हणजे या प्रकरणात ते एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. त्यांची साक्ष आणि इतर पुराव्यांच्या आधारे आता अप्पर जिल्हा न्यायाधीश अनिल कुमार शुक्ला यांनी आरोपीला २० हजार रुपयांचा दंड आणि आजन्म तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.