कोची - एअर इंडियाच्या विमानातील एका कॅबिन क्र्यू कर्मचाऱ्यानेच सोन्याची तस्करी केल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी कोची विमानतळावर एअर इंडियाच्या या कर्मचाऱ्याला कस्टमच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. मूळ वायनाडचा रहिवाशी असलेला शफी हा एअर इंडियाच्या विमानात कॅबिन क्रू म्हणून कार्यरत आहे. एअर इंडियाच्या बहरीन-कोझिकोड विमानातून कॅबिन क्रू सोन्याची स्मगलींग करत असल्याची गोपनीय माहिती कस्टम अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार, अधिकाऱ्यांनी या स्टाफवर करडी नजर ठेऊन शफीला उघडं केलं.
शफीने सोने तस्करीचा वेगळाच फंडा निवडला होता, मात्र कस्टम अधिकाऱ्यांच्या नजेरतून तो वाचू शकला नाही. कस्टमने त्याच्याकडून १ किलो ४८७ ग्रॅम सोने जप्त केले. शफीने आपल्या दोन्ही हाताच्या शर्टातील बाह्यांमध्ये आतील बाजूने सोनं गुंडाळून लपवंलं होतं. मात्र, अधिकाऱ्यांच्या डोक्यापुढे त्याची आयडिया अंगलट आली. सध्या त्याच्याकडून या सोन तस्करीबाबत अधिक चौकशी सुरू आहे.
दरम्यान, चेन्नई सीमा शुल्क विभागाने सिंगापूरवरुन आलेल्या दोन प्रवाशांकडून चेन्नई विमानतळावर ६.८ किलो सोनं जप्त केलं आहे. बाजार मुल्यानुसार या सोन्याची किंमत ३.२ कोटी रुपये एवढी आहे. प्रवासी-३४७ आणि ६ई-५२ ने सिंगापुरवरुन चेन्नईला पोहोचले होते. चेन्नई कस्टमने ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली.