साक्री तालुक्यातील दहिवेलच्या एका नोकरदाराला ५० लाखांचे बिनव्याजी कर्ज देण्याचे आमिष दाखवून सुमारे १० लाखांचा गंडा घालण्यात आला होता. याप्रकरणी धुळे सायबर पोलिसांत तक्रार येताच पाच ठगबाजणा जेरबंद करण्यात धुळे सायबर पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून सुमारे सव्वा लाखांची रोकड व ६ मोबाईल हस्तगत केले आहे.
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील अजय शिवाजी पाटील यांना तोतया बजाज फायनान्स लि. कंपनीच्या मॅनेजरचा फोन कॉल आला होता. त्याने ५० लाखांचे बिनव्याजी कर्ज देण्याचे आमिष दाखविले. यासाठी अगोदर विमा पॉलिसी काढण्याचे सांगितले. यावर विश्वास ठेवून अजय पाटील व त्यांच्या वहिनीने वेळोवेळी ९ लाख ९९ हजार ३०० रुपये जमा केले. मात्र, पैसे भरुनही कर्ज न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अजय पाटील यांनी पोलीस ठाणे गाठले.
धुळे सायबर पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर करत ऑनलाईन ठगांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यासाठी सायबर पोलिसांनी मुंबई, ठाणे, शिर्डी गाठले असता सर्वात आधी कल्याण येथून विवेक विनोद सिंग व शिवम राजू जयस्वाल यांना १ जानेवारी रोजी ताब्यात घेतले होते. त्यांनी गुन्ह्यातील मास्टर माइंड प्रल्हाद गजानन वाठोडकर हा असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी लागलीच सायबर पोलिसांचे पथक वाठोडकरच्या मागावर पाठविले. पोलिसांचा ससेमीरा लागताच त्याने नाशिकहून शिर्डीच्या दिशेला पळ काढला.
धुळे पोलिसांनी २ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजता शिर्डी येथून प्रल्हाद वाठोडकरला अटक केली. त्यानेही आणखी दोघांची नावे पोलिसांना सांगीतली. त्यावरुन ६ जानेवारीला ठाणे येथून अविनाश हनुमंत वांगडे व गोळेगाव ता. जुन्नर जि.पुणे येथून सागर विजय माळी याला ९ जानेवारी रोजी जेरबंद केले. ऑनलाईन ठगांनी गुन्हा कबुल केला असून त्यांनी इतरांचीही फसवणूक केल्याची चौकशी सुरु आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषीकेश रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली पोनि धनंजय पाटील, पोउनि. कोठुळे, असई जगदिश खैरनार, पोहेकों भूषण खलाणेकर, राजेंद्र मोरे, पोना अमोल पाटील, पोकों दिलीप वसावे, तुषार पोतदार, प्रसाद वाघ यांच्या पथकाने ही कारवाई केली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यावेळी दिली.