राजेंद्र शर्मा, धुळे: पांझरा नदीपात्रात बुडून प्रवीण सखाराम खैरनार (वय ४०) याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना साक्री तालुक्यातील भाडणे शिवारात गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. तो पाण्यात गेला कसा हे समजू शकलेले नाही.
साक्री तालुक्यातील भाडणे गावालगत पांझरा नदी आहे. या परिसरात गवत असल्यामुळे गुराखी या ठिकाणी गुरे चारण्याची कामे करतात. गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास गुरे चालत असताना पांझरा नदीपात्रात एक जण पाण्यात तरंगत असल्याचे दिसून आले. पाण्यात तरंगणारी व्यक्ती ओळखीची असल्यामुळे गुराखी याने भाडणे गावातील ग्रामस्थांना कळविण्यासाठी धाव घेतली. माहिती मिळताच ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळेस प्रवीण सखाराम खैरनार (वय ४०, रा. वघाणे, ता. सटाणा, जि. नाशिक, हमु नांदवण, ता. साक्री) हा इसम पाण्यात तरंगताना आढळून आला. त्याला पाण्याबाहेर काढून साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉ. चित्तम यांनी तपासून गुरुवारी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास मयत घोषित केले. याप्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल दीपक विसपुते करीत आहेत.