नालासोपारा : विरारच्या चिखलडोंगरी गावातीला एका कुटुंबाला वाळीत टाकल्याप्रकरणी मांगेला समाजातील जात पंचायतीच्या १६ व इतर कमिटी सदस्यांविरोधात अर्नाळा पोलिसांनी महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
विरारच्या चिखलडोंगरी गावात मांगेला समाजाचे लोक राहतात. या गावात आजही जात पंचायत अस्तित्वात आहे. जात पंचायतीविरोधात जाणाऱ्यांना २५ हजार ते एक लाखापर्यंतचा दंड आकारला जातो. मुरबाड तालुक्यातील सासणे येथे असलेल्या दत्त देवस्थान वारकरी मंडळ ट्रस्टबरोबर गावातील पंचायतीचा वाद आहे. त्यामुळे चिखलडोंगरी ग्रामस्थांना सासणेला जायला बंदी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगला केवल वैती यांचे विरारमधील चिखलडोंगरी हे मूळगाव असून, मुरबाडच्या सासणे येथील नीलेश जोशी यांना ते गुरू मानतात व त्यांच्याकडे येणे-जाणे आहे. मंगला यांचे गुरू नीलेश जोशी व गावकऱ्यांचे पूर्वीपासून वाद आहेत. त्यामुळे त्यांच्याशी कोणीही संबंध ठेवू नये, असे जात पंचायतीचे म्हणणे आहे. वैती यांच्या घरी नीलेश जोशी हे येत असल्याने वाद झाला हाेता.
गावात तणावपूर्ण वातावरणमंगला यांनी मंगळवारी रात्री तक्रार देऊन धनेश मेहेर, धनश्याम तांडेल, कौशल्या केशव राऊत, किरण भास्कर मेहेर, हितेश रामचंद्र मेहेर, भारत नारायण पाटील, राजेश रामचंद्र मेहेर, जगदीश काशिनाथ म्हात्रे, मनीष काशिनाथ म्हात्रे, किशोर नारायण पाटील, ईश्वर बबन वैती, प्रभाकर हरिश्चंद्र मेहेर, विशाल जगन्नाथ वैती, प्रकाश मेहेर, किरण नारायण मेहेर, मोतीराम दामोदर वैती व इतर जात पंचायत कमिटी सदस्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या गावात तणावपूर्ण वातावरण असून, पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.