अण्णा नवथर, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर: हात उसने घेतलेले पैसे बुडविण्यासाठी शेतकऱ्याने चक्क सात लाख रुपये लुटल्याचा बनाव केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी शेतकऱ्यास ताब्यात घेऊन नेवासा पोलिस ठाण्यात हजर केले आहे. संदीप गणपतराव फुगे ( ३८, रा. पाचेगाव, ता. नेवासा ) असे ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपी संदीप फुगे या शेतकऱ्याने मोटारसायकलवरून टाकळीभान ते पाचेगाव रस्त्यावरून जात असताना दोन अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून लुटले असल्याची फिर्याद नेवासा पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार नेवासा पोलिसांनी रस्ता लुटीचा गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी फुगे हा विसंगत माहिती देत असल्याने पोलिसांना शंका आली. पोलिसांनी फिर्यादी फुगे यास ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्याने लुटीचा बनाव केल्याची कबुली दिली.
लोकांकडून पैसे उसने घेतले होते. ते अपणाकडे पैशांसाठी तगादा करत होते. दरम्यान घर बांधण्यासाठी बंकेतून सात लाखांचे कर्ज घेतले होते. ही रक्कम घरात ठेवून चाेरट्यांनी लुटल्याचा बनाव केला, अशी कबुली आरोपींनी दिली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख दिनेश आहेर यांच्या पथकाने केली.