लखनौ - उत्तर प्रदेशच्या लखनौ इथं हैराण करणारी घटना उघडकीस आली आहे. याठिकाणी १४ वर्षीय मुलगी अचानक घरातून बेपत्ता झाली होती. जेव्हा ती गायब झाली तेव्हा घरात केवळ तिचे वडील होते. आई माहेरी गेली होती. १ महिन्याने आई घरी परतली तेव्हा मुलगी न दिसल्याने ती घाबरली. तिने पतीला विचारणा केली. मात्र त्यांच्याकडून काही ठोस उत्तर न मिळाल्याने अखेर महिलेने पोलीस ठाणे गाठले. गेल्या १ महिन्यापासून मुलगी बेपत्ता आहे यामागे माझ्या पतीचा हात असल्याचा संशय तिने पोलिसांना सांगितला.
आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महिलेच्या पतीकडे सखोल चौकशी केली तेव्हा त्याने सत्य सांगितले. मुलीचा मृत्यू झाल्याचं वडिलांनी पोलिसांना सांगितले जे ऐकून त्यांना धक्का बसला. मोहनलालगंजच्या सोहावा गावातील ही घटना आहे. सोमवारी सुनीता नावाची महिला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली, जी १ महिना तिच्या माहेरी होती. जेव्हा ती घरी परतली तेव्हा तिला मुलगी दिसली नाही. तिने पती संजीवलाल यांच्याकडे विचारणा केली.
वडिलांनी गेल्या १ महिन्यापासून मुलगी गायब असल्याचं मुलीच्या आईला सांगितले. तेव्हा मुलगी बेपत्ता असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार का नोंदवली नाही असा प्रश्न महिलेने केला. तेव्हा मला काही माहिती नाही अशी उडवाउडवीची उत्तरे त्याने दिली. संजीवलाल ठोस काही सांगत नसल्याने अखेर या महिलेने लेकीच्या शोधासाठी पोलिसांकडे धाव घेतली. मुलगी बेपत्ता होण्यामागे पतीचा हात तर नाही ना अशी शंका तिच्या मनात होती. तिने मुलगी गायब असल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. जेव्हा पोलिसांनी कसून पतीची चौकशी केली तेव्हा त्याने सर्व रहस्य उलगडलं.
आत्महत्या की हत्या?
पोलिसांच्या चौकशीत बापाने सांगितले की, ६ मे रोजी रात्री मुलगी फोनवर कुणासोबत तरी बोलत होती. तिला ओरडल्यानंतर ती ठीक होती. सर्वांनी जेवण केल्यानंतर झोपायला गेलो तेव्हा रात्री उशिरा मुलीने गळफास घेतला होता. सकाळी ६ वाजता मी मुलीच्या खोलीत गेलो तेव्हा ती फासावर लटकली होती. ते पाहून मी घाबरलो. माझ्या लहान मुलासह मी मुलीचा मृतदेह खाली उतरवला. त्यानंतर घरच्या शेजारील तबेल्यात एक खड्डा खोदून त्यात तिचा मृतदेह दफन केला. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून ही आत्महत्या होती ती हत्या याचा शोध घेत आहे. मुलीचा मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी पोस्टमोर्टमला पाठवला आहे.