ठाणे : सकाळी नाश्ता दिला नाही या रागातून सासऱ्याने सुनेवर गोळी झाडल्याची घटना ठाण्याच्या राबोडीत समोर आली आहे. या घटनेत गंभीररीत्या जखमी झालेल्या सीमा पाटील (४२) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर मारेकरी सासरा काशिनाथ पाटील (७४) हे घटनेनंतर पळून गेले आहेत. ज्या बंदुकीतून गोळीबार केला, ती परवानाधारक बंदूक आहे. तसेच फरार सासऱ्याच्या माघारवर पोलीस पथक असल्याची माहिती राबोडी पोलिसांनी दिली.
बांधकाम व्यावसायिक असलेले मारेकरी काशिनाथ पाटील यांना दोन मुले आहेत. हे कुटुंब एकत्र राहत असून काशिनाथ यांचे त्यांच्या पत्नीसह दोन्ही सुनांबरोबर वारंवार खटके उडत होते. त्यातच ते नातेवाईकांकडे सुनांची बदनामी करत, त्यातच गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास काशिनाथ पाटील यांना नाश्ता मिळाला नाही. याच रागातून त्यांनी बंदूक काढून मोठा मुलगा राजेंद्र यांची पत्नी सीमा यांच्या पोटात गोळी झाडली. हा प्रकार छोट्या सुनेसमोर घडला. जखमी झालेल्या सीमा यांना ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.तेथे शस्त्रक्रिया ही करण्यात आली. मात्र गुरुवारी रात्री त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून फरार झालेल्या काशिनाथ पाटील यांचा शोध असल्याची माहिती राबोडी पोलिसांनी दिली.
" सासरे काशिनाथ यांनी त्यांची मोठी सुन सीमा हिच्यावर गोळी झाडली. गोळी पोटात लागल्याने त्या गंभीररीत्या जखमी झाल्या. त्यांच्यावर शस्त्रक्रिया ही करण्यात आली. पण त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्या बंदुकीतून गोळीबार झाला ती परवाना धारक आहे. तसेच काशिनाथ हे फरार असून त्यांना सकाळी नाश्ता मिळाला नसल्याने त्यांनी गोळी झाडल्याचे प्राथमिकदर्शी दिसत आहे. छोट्या सुने समोर हा प्रकार घडला असून त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे."- संतोष घाटेकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक,राबोडी पोलीस ठाणे