नवी दिल्ली - शहरातील पालम भागात एकाच कुटुंबातील ४ जणांच्या हत्येनं खळबळ माजली होती. आता या प्रकरणात आरोपीच्या पोलीस चौकशीत नवा खुलासा झाला आहे. आरोपी मुलानं सर्वात जास्त स्वत:च्या बापावर चाकूने वार केले. वडिलांच्या शरीरावर चाकू हल्ल्याच्या २० जखमा दिसल्या. बुधवारी सकाळी झालेल्या भांडणात वडिलांनी ओरडले होते. त्याचाच बदला घेण्यासाठी मुलानं कुटुंबातील सदस्यांचे हत्याकांड घडवले असं तपासात निष्पन्न झालं आहे.
पालम भागात आरोपी मुलगा केशवनं त्याचे आई वडील, आजी आणि बहिणीची हत्या केली. आरोपी केशव ड्रग्सच्या आहारी गेला होता. पोलीस तपासानुसार, बुधवारी संध्याकाळी केशवनं प्रथम आजीची हत्या केली. त्यावेळी घरात कुणीही हजर नव्हते. त्याने आजीकडे काही पैसे मागितले होते. परंतु तिने देण्यास नकार दिला. त्यामुळे केशवने तिची हत्या केली. त्यानंतर वडील, आई आणि शेवटी बहिणीला मारलं. घटनास्थळावरून पळून जाताना आरोपीला पोलिसांनी पकडले.
बुधवारी रात्री आरोपी केशव खूप वेळ जागा होता. त्यासाठी वडिलांनी त्याला २० मिनिटे ओरडले. माझ्याकडे नोकरी नाही, तू बेकार बसलाय, कुटुंबावर ओझं आहे तू. असं वडिलांनी सुनावलं. त्यानंतर केशव खूप नाराज झाला आणि घराबाहेर पडला. पोलीस चौकशीत आरोपी केशव बेधडक सगळ्या प्रश्नांना उत्तर देत आहे. त्याला कुठेही केलेल्या कृत्याची लाज नाही. कुटुंबाचीच चूक होती असं आरोपी बोलत आहे. मला वडिलांना क्रूरपणे मारायचं होतं हाच विचार माझा होता असं त्याने चौकशीत सांगितले.
एक वर्षापूर्वी आरोपीचं त्याच्या गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झालं. त्यानंतर मी पूर्णत: विखुरलो. या काळात मला कुटुंबातील एकानेही साथ दिली नाही. त्याऐवजी वडील माझ्यावर ओरडायचे. सतत टोमणे मारायचे त्यामुळे मी हत्या केली. सर्वाधिक १८-२० वार बापावर केले असं आरोपीने कबूल केले. केशव व्यसनाधीन होता. त्याला ड्रग्सचं व्यसन जडलं होते. त्यासाठी त्याला एका केंद्रात पाठवलं होते. १ वर्षापूर्वीच तो घरी आला. तो कायम घराच्या बाहेर राहायचं. १५ दिवसांपासून तो बेपत्ता होता आणि मंगळवारी तो घरी परतला आणि बुधवारी संपूर्ण कुटुंबाची हत्या केली असा खुलासा पोलीस तपासात झाला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"