नाशिक : बाप-लेकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना मागील वर्षी पंचवटीत घडली होती. एका बापाने आपल्या अल्पवयीन मुलीला धमकावत बलात्कार केला होता. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात बलात्कारासह पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात झालेल्या अंतीम सुनावणीत न्यायाधीश श्रीमती एम.व्ही.भाटीया यांनी संशयित बापाला गुरुवारी (दि.२३) दोषी धरले. त्यास जन्मठेप व २५ हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली.
पोलीस आयुक्तालयातील पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९ एप्रिल २०२१ रोजी एका गल्लीत राहणाऱ्या ४०वर्षीय संशयित इसमाने त्याच्या अल्पवयीन मुलीला वासनेचा बळी बनविले होते. या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात होता. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात पिडितेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपनिरिक्षक धनश्री पाटील यांनी करत आरोपी बापाच्या कुकर्माबाबतचे सबळ परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले. तसेच गुन्हा सिद्ध होण्याच्या दृष्टीने साक्षीदार व पंचांची साक्षही नोंदविली. चिकाटीने कौशल्यपुर्ण तपास करत न्यायालयापुढे दोषारोपपत्र पाटील यांनी सादर केले.यानुसार न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या अंतीम सुनावणीत गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश भाटिया यांनी आरोपी बापाला परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदार व पंचांनी दिलेली साक्षच्याअधारे दोषी धरले. सरकार पक्षाकडून ऍड. रेवती कोतवाल यांनी युक्तीवाद केला. न्यायालयाने आरोपी बापाला जन्मठेप व २५ हजारांचा दंड अशी शिक्षणा सुनावली आहे. गुन्हा घडल्यानंतर एक वर्षात पिडितेला न्याय मिळाल्याने जलद न्यायप्रक्रियेविषयी समाधान व्यक्त होत आहे.