नंदुरबार : स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने चौघांनी गुजरातमधील महिलेस पाच लाखात फसविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. १७ जानेवारी रोजी घडलेल्या घटनेची फिर्याद मंगळवारी सायंकाळी उशिरा दाखल करण्यात आल्याने नंदुरबार तालुका पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनुसार, वापी, जि. बलसाड (गुजरात) येथे राहणाऱ्या सुनीता रमेश पवार (४९) या काही दिवसांपूर्वी नंदुरबार ते बोरिवली या रेल्वे गाडीने प्रवास करीत होत्या. प्रवासादरम्यान त्यांना २५ वर्षे वयाच्या युवकाशी भेट झाली. त्याने विहीर खोदत असताना सात किलो सोने सापडल्याचे सांगत घ्यायचे असल्यास कमी किमतीत ते देतो, असे सांगितले. त्यानंतर त्यांना आणखी एका मोबाइल क्रमांकावरून फोन आला व सोने कमी किमतीत देण्याचे सांगितले. त्यानंतर १६ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता सुनीता पवार यांना संबंधीत व्यक्तीने नंदुरबार -खांडबारा रस्त्यावर ढेकवद येथे रेल्वे स्थानक परिसरात बोलावून घेतले. तेथे त्यांना सोन्याचा तुकडा दाखवून तो खरा असल्याची खात्री दिली. त्यानंतर १७ जानेवारी रोजी पुन्हा काळंबा फाट्याजवळ बोलावून घेत पैसे आणण्यास सांगून सर्व अर्थात साडेपाच किलो सोने देणार असल्याचे सांगितले.
महिलेने त्यांच्यावर विश्वास ठेवत साडेपाच लाख रुपयांची असलेली बॅग सोबत आणली. परंतु, परिसर निर्मनुष्य असल्याचा फायदा घेत चौघांनी त्यांच्याकडील बॅग हिसकावून दुचाकीने तेथून शेतातील कच्च्या रस्त्याने पसार झाले. त्यानंतर आपण फसलो गेल्याचे लक्षात आल्यावर महिलेने पाठपुरावा केला. त्यावेळी किरण पवार (रा. जामदा, ता. साक्री) यांनी मध्यस्थी करून ५० हजारात प्रकरण मिटवून टाका म्हणून सांगितले. त्यानंतर मंगळवारी सुनीता पवार यांनी फिर्याद दिल्याने किरण पवार (रा. जामदा, ता. साक्री) व इतर तीन जणांविरूद्ध नंदुरबार तालुका पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक विजय गोपाळ तपास करीत आहेत.