खामगाव : हिंगणा शिवारातील मस प्रकल्पातील पाण्यात सोडलेल्या पाणबुडी आणि मोटारपंप चोरून नेताना चार चोरट्यांना शेतकऱ्यांनी सतर्कतेने पकडले. पकडण्यात आलेल्या तिघांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले, तर एक आरोपी पसार होण्यात यशस्वी झाला. ही घटना गुरुवारी रात्री उशिरा हिंगणा कारेगाव शिवारात घडली.
याबाबत सविस्तर असे की, हिंगणा कारेगाव येथील संतोष गजानन फाळके (वय ३२) व त्यांचा मित्र गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हिंगणा शिवारातील मस प्रकल्पातील पाणबुडी मोटार सुरू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी बाळापूर येथील सैय्यद इमरान सैय्यद मिर (५८) एकलाक शाह अहमद शाह (२३), शेख रिजवान शे बाबा (२८) आणि अशपाक शाह आदिल शाह (२०) चौघे मस प्रकल्पात शेतकऱ्यांनी टाकलेल्या पाणबुडी आणि मोटारपंप एमएच-१५, सीडी-२९५७ कारमधून चोरून नेताना आढळून आले.
या घटनेची माहिती फाळके यांनी दूरध्वनीवरून गावातील शेतकऱ्यांना दिली. मात्र, तत्पूर्वीच चोरट्यांनी वाहनातून पळ काढला. त्यावेळी तक्रारदारासह गावातील नागरिकांनी चौघांनाही पाठलाग करून पकडले. यावेळी झालेल्या धावपळीत एकजण पसार होण्यात यशस्वी झाला. या घटनेची माहिती तत्काळ ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरोधात भादंवि कलम ३७९, ५११, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.
चोरट्यांचा गावकऱ्यांकडून पाठलागचोरी करताना सहज घटनास्थळ सोडता यावे यासाठी आरोपींनी आपल्या ताब्यातील चारचाकी वाहन सुरूच ठेवले होते. चोरट्यांच्या संशयास्पद हालचालीची बारीकसारीक माहिती हिंगणा कारेगाव येथील शेतकऱ्यांना दिली जात होती. चोरट्यांना संशय येण्यापूर्वीच शेतकऱ्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. धरणावरून गावाकडे येत असताना वाटेतच त्यांना गावकऱ्यांंनी गाठले.
शेतकरी युवकाची सतर्कता फळासखामगाव तालुक्यातील बोरी अडगाव येथील दरोड्यानंतर ग्रामीण पोलिसांनी स्वत:सह मालमत्तेच्या रक्षणार्थ सतर्क राहण्याचे आवाहन केले. बोरी अडगाव येथे बैठक घेत, ग्राम सुरक्षा दलाचे महत्त्व विषद केले. या बैठकीला बोरी अडगावसह हिंगणा कारेगाव येथील युवकही उपस्थित होते. या बैठकीतून बोध घेत, खामगाव तालुक्यात ग्राम रक्षक दल कार्यान्वित होत आहेत. गुरुवारी सतर्कतेतूनच चोरीचा प्रयत्न फसल्याची चर्चा आहे.
चोरी, दरोडे आणि तत्सम गुन्हे टाळण्यासाठी युवकांना प्रेरित केले. त्याचे फलित गुरुवारी सायंकाळच्या घटनेत दिसून आले. गावोगावी ग्राम सुरक्षा दल स्थापन व्हावे.- सुरेश नाईकनवरे(पोलिस निरीक्षक, खामगाव ग्रामीण)