वाशिम : ‘एटीएम मशीन’च्या वितरण व्यवस्थेत बिघाड करून बॅंकांना गंडविणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे. या टोळीतील गुन्हेगारांनी १९ ‘एटीएम कार्ड्स’व्दारे ७६ वेळा वेगवेगळ्या ठिकाणच्या ‘एटीएम’व्दारे ७.५५ लाख रुपयांची रक्कम काढल्याचे प्रथमदर्शनी तपासात उघड झाल्याचे सांगण्यात आले आहे.
वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये कलम ४२० भादंवि, सहकलम ४३ (ई)(एच), ६६ (सी) माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये दाखल तक्रारीनुसार, दि वाशिम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, वाशिम यांच्या अकोला, अमरावती, वाशिम, मानोरा आणि रिसोड येथे असणाऱ्या एटीएम मशीनद्वारे व्यवहार करत असताना एटीएममधून रोख रक्कम वितरणाप्रसंगी दोन बोटे ‘डिस्पेन्सिंग शटर’मध्ये ठेवून तथा बोटांच्या सहाय्याने कॅश वितरण यंत्रणेच्या रोलसीलला आत ढकलून मशीनमध्ये बिघाड केला जात होता. यामाध्यमातून संबंधित आरोपींनी ७.५५ लाखांची रक्कम परस्पर काढून घेतली होती. दरम्यान, कुठलेही ठोस धागेदोरे उपलब्ध नसताना केवळ तांत्रिक बाबींच्या आधारे प्रकरणाचा तपास करण्यात आला. त्यात १० वेगवेगळ्या बँकांच्या खात्यांशी संलग्न १९ एटीएम कार्डद्वारे ७६ वेळा वेगवेगळ्या एटीएममधून रक्कम काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
एटीएम कार्डशी संबंधित मोबाईल क्रमाकांचा तपास केला असता, तो अरविंद कुमार अवस्थी, रा.कानपूर, उत्तर प्रदेश या एकाच इसमाच्या नावे असल्याचे आणि त्यानेच त्याचे सीम कार्ड वेगवेगळ्या इसमांना देऊन एटीएममधून पैसे काढण्यासाठी रवाना केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
‘सीसीटीव्ही फुटेज’मुळे आरोपी झाले गजाआडतपासात निष्पन्न झालेल्या अरविंद कुमार अवस्थीच्या संपर्कात असलेले व एटीएम मशिनच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलेल्या आरोपींचा पोलिसांनी कसून शोध घेतला. त्याआधारे वैभव ऋषभदेव पाठक (२३), सत्यम शिवशंकर यादव (२३), सौरव मनोज गुप्ता (२१) आणि प्रांजल जयनारायण यादव (२४) यांना अटक करण्यात आली.
अरविंद कुमार अवस्थी कानपूरच्या कारागृहातमुख्य आरोपी अरविंद कुमार अवस्थी याच्यावर पो.स्टे. कलेक्टरगंज, कानपूर, उत्तरप्रदेश येथे कलम ४२० भादंवि अन्वये गुन्हा दाखल असून तो सध्या कानपूरच्या कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याला तेथून घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.