लखनौ: उत्तर प्रदेशातील ललितपूर येथील एका १३ वर्षीय बलात्कार पीडितेवर पोलीस ठाण्याच्या प्रभारीने बलात्कार केल्याची घटना घडली आहे, ज्यावेळी पीडिता पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेली होती. पीडित तरुणीने आरोप केला आहे की, तिच्यावर चार जणांनी बलात्कार केला होता, त्यानंतर ती एका नातेवाईकासह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेली होती. आरोपी अधिकारी असलेल्या स्टेशन हाऊस ऑफिसर टिळकधारी सरोज याला निलंबित करण्यात आले असून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो फरार असून तीन पोलीस पथके त्याचा शोध घेत आहेत, असे ललितपूरमधील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. अन्य तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या सर्व पोलिसांना कर्तव्यावरून हटवण्यात आले आहे. डीआयजी दर्जाचा अधिकारी या प्रकरणाची चौकशी करेल आणि २४ तासांत अहवाल सादर करणार आहे .
जामा मशिदीजवळ शस्त्रासह संशयिताला अटक, पोलिसांनी सुरु केला तपास
याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले असून तो फरार आहे. गेल्या २२ एप्रिलला एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून चार तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. आरोपींच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर पीडिता पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास पोहोचली. मात्र, तिथे तिला न्याय मिळण्याऐवजी पुन्हा यातनांचा मिळाल्या. तिच्यावर पोलीस अधिकाऱ्याने बलात्कार केला, असा आरोप १३ वर्षीय अल्पवयीन मुलीने केला आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशपोलिसांनी गंभीर दखल घेतली असून आरोपी पोलीस अधिकारी आणि इतर आरोपींना अटक करण्यासाठी ३ पोलीस पथके तयार करण्यात आली आहे. पीडितेने या घटनेची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पोलीस अधिकाऱ्याला अद्याप अटक झालेली नाही.