तेलंगणातील विकाराबाद जिल्ह्यात एका 18 वर्षीय मुलीला तिच्या आजारावर उपचार करण्यासाठी जळत्या निखाऱ्यावर उभं करणार्या स्वयंघोषित धर्मगुरूला पोलिसांनीअटक केली आहे.जिल्ह्यातील कुकिंडा गावातील पदवीपूर्व प्रथम वर्षातील पीडित विद्यार्थिनी एका आजाराने त्रस्त होती आणि नियमित औषधोपचाराने ती बरी होत नव्हती. काही गावकऱ्यांकडून सल्ला मिळाल्यानंतर, तिच्या पालकांनी तिला शुक्रवारी, 13 मे रोजी नास्कल गावातील स्वयंघोषित धर्मगुरू रफी यांच्याकडे उपचारासाठी नेले.रफी दर शुक्रवारी एका दर्ग्यात ‘उपचार’ शिबिर चालवत असत जिथे मोठ्या संख्येने लोक त्यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी येत असत. असा आरोप आहे की, स्वयंघोषित धर्मगुरुने मुलीच्या पालकांना 18 वर्षांची मुलगी वाईट आत्म्यांच्या तावडीत असून तिला काही अध्यात्मिक उपायाने बाहेर काढण्याची गरज असल्याचं सांगितलं. रफीने मुलीला जळत्या निखाऱ्यांवर उभे केले असा आरोप आहे. यामुळे मुलगी खूप भाजली असून तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.प्रसारमाध्यमांनी या घटनेचे वृत्त दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. मुलीच्या जबाबाच्या आधारे, पोलिसांनी स्वयंघोषित धर्मगुरू रफी याला अटक केली, त्याला स्थानिक न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठवले.