भररस्त्यात युवतीची टोळक्यांकडून छेडछाड; मध्य प्रदेशातील व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 01:12 PM2022-03-13T13:12:25+5:302022-03-13T13:12:59+5:30
पोलीस सध्या या व्हिडीओच्या आधारे तपास करत असून लवकरच आरोपींना पकडू असं आश्वासन देत आहे.
अलीराजपूर - सध्या सोशल मीडियावर मध्य प्रदेशातील एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात काही मुलांकडून मुलीचा विनयभंग होत असल्याचं दिसून येते. माहितीनुसार, ही घटना अलीराजपूर जिल्ह्यातील बलपूर गावात आयोजित केलेल्या भगोरिया उत्सवात रेकॉर्ड करण्यात आल्याचं बोललं जात आहे. व्हिडीओत काही नराधमांची टोळी मुलीला स्पर्श करत असल्याचं दिसतं. ती मुलगी स्वत:चा बचाव करण्याचाही प्रयत्न करत असते.
हा व्हिडीओ खूप उंचीवरून रेकॉर्ड करण्यात आला आहे. त्यामुळे मुलांची ओळख पटवणं शक्य होत नाही. पोलीस सध्या या व्हिडीओच्या आधारे तपास करत असून लवकरच आरोपींना पकडू असं आश्वासन देत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ज्यात काही मुलं एका मुलीची छेडछाड करताना दिसतात. ही घटना गावात आयोजिक करण्यात आलेल्या जत्रेदरम्यान घडली आहे. भगोरिया उत्सवाचा उल्लेख मध्य प्रदेशातील आदिवासी भागात सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध जत्रेपैकी एक आहे.
या प्रकरणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज सिंह म्हणाले की, पोलिसांनी व्हिडीओची दखल घेऊन गुन्हा नोंदवला आहे. आम्ही त्या युवकांचा शोध घेत आहोत. पोलिसांचे पथक या घटनेची चौकशी करत असून लवकरात लवकर आम्ही आरोपींना ताब्यात घेऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान माजी केंद्रीय मंत्री कांतीलाल भूरिया यांनी पोलीस प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. भूरिया यांनी म्हटलं की, ही खूप निंदणीय घटना आहे. जत्रेच्यावेळी पोलीस कर्मचारी कुठे होते? प्रशासनाने लवकरात लवकर या आरोपींना पकडून त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करावी. आम्ही या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव टाकू. आदिवासी महिलेची अशाप्रकारे छेडछाड करणारे मानसिक प्रवृत्तीचे युवक आदिवासी समाजाला नको असं त्यांनी सांगितले. तर काँग्रेस आमदार मुकेश पटेल यांनी ही घटना लज्जास्पद आहे. त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी. भगोरिया उत्सवात अशाप्रकारे युवकांना जागा नको. पीडितांना न्याय देण्याचं काम पोलिसांनी करावं असं म्हटलं आहे.