जळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात सात वर्षाची शिक्षा भोगून घरी परत आल्यावर पुन्हा पाच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या संदीप सुदाम तिरमली (वय ३६,रा.शिरसगाव, ता.चाळीसगाव) याला न्यायालयाने नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.एन. खडसे यांनी गुरुवारी हा निकाल दिला.
या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, ३ जानेवारी २०२१ रोजी रात्री आठ वाजता पीडिता ही मैत्रीणींसोबत खेळत असताना संदीप तिरमली याने तिला खाऊ देण्याचे आमिष दाखवून स्वत:च्या घरात घेऊन गेला. यावेळी खाऊ घेण्यासाठी १० रुपयांच्या तीन नोटा देत तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर पीडिता रडतच घरी आली होती. तिच्या हातात असलेल्या नोटांवर रक्ताचे डाग होते. झालेला प्रकार तिने आईला सांगितला. याबाबत मेहुणबारे पोलीस ठाण्यात कलम ३७६ (२) आय, ३७७ आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम २०१२ चे कलम ४, ६, ८, १२ नुसार गुन्हा दाखल झाला होता.
पीडितेची साक्ष नाही, डीएनए ठरला पुरावाया खटल्याचे वैशिष्ट असे की, यात न्यायालयाने पीडितेची साक्ष नोंदविली नाही. तपासाधिकारी हेमंत शिंदे यांचा योग्य तपास, शास्त्रीय पुरावे व डीएनएचा अहवाल खूप महत्वाचा ठरला. त्याशिवाय फिर्यादी, तपासाधिकारी, डॉक्टर यांच्या साक्षीही तितक्याच महत्वपूर्ण ठरल्या. सरकारी वकील केतन ढाके यांनी सहा साक्षीदार तपासले. त्यानंतर आरोपीने याआधी देखील २०१२ मध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता, त्यात त्याने सात वर्ष शिक्षा भोगली, तरी देखील त्याच्यात सुधारणा झाली नाही. पुन्हा केलेले कृत्यू माणुसकीच्या नात्याला काळीमा फासणारे असल्याचा प्रभावी युक्तीवाद केला. पैरवी अधिकारी देविदास कोळी व केसवॉच दीपक महाजन यांचे सहकार्य लाभले.
घटना घडल्यापासून आरोपी कारागृहात- ३ जानेवारी २०२१ रोजी ही घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी लागलीच आरोपीला अटक केली होती. तेव्हापासून तो कारागृहातच आहे. गुरुवारी त्याला न्यायालयात आणण्यात आले होते. शिक्षेनंतर पुन्हा त्याची कारागृहात रवानगी झाली. आरोपी हा अविवाहित असल्याचे सांगण्यात आले.
असे कलम, अशी शिक्षा...- ३७६ (२) : दहा वर्ष कारावास व एक हजार रुपये दंड.- ३७६ (एबी) : मरेपर्यंत कारावास व दोन हजार रुपये दंड.- बा.लै.अ.प्र. ३ : सात वर्ष कारावास, एक हजार रुपये दंड.- बा.लै.अ.प्र. ५ : दहा वर्ष कारावास, एक हजार रुपये दंड.