नरेश डोंगरे
नागपूर : सीबीआयच्या कोठडीत असलेले सीजीएसटीचे सहआयुक्त मुकुल पाटील यांच्या कार्यालयातून संशयास्पद नोंदी असलेली अनेक कागदपत्रे सीबीआयच्या पथकाने शनिवारी जप्त केली. त्याचप्रमाणे त्यांच्या बँकेतील लॉकरमध्येही सीबीआयला सोन्याच्या दागिन्यांचे घबाड मिळाले. या घडामोडींमुळे पाटील-राजंदेकर या जोडीचे पाय आणखी खोलात जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील जयंत लक्ष्मीकांत चौपाणे नामक कंत्राटदाराकडून चार लाख रुपयांची लाच स्वीकारताना सीबीआयच्या पथकाने हेमंत राजंदेकर या चार्टर्ड अकाउंटंटसह मुकुल पाटील यांना ताब्यात घेतले होते. सध्या हे दोघे सीबीआयच्या कोठडीत आहेत. सीबीआयच्या पथकाकडून मुकुल पाटील यांच्या निवासस्थानी झडती घेण्यात आली. त्यात ४० तोळे सोने, १३.२५ लाखांची रोकड सीबीआयच्या हाती लागली. शनिवारी पाटील यांच्या कार्यालयातून सीबीआयने संशयास्पद नोंदी असणारी अनेक कागदपत्रे जप्त केली. या कागदपत्रांत देण्याघेण्याच्या अनेक नोंदी असल्याचे सूत्रांचे सांगणे आहे. दरम्यान, पाटील यांच्या बँकेतील लॉकरचीही सीबीआयच्या पथकाने शनिवारी तपासणी केली. यात २६ लाखांचे सोन्याचे दागिने सीबीआयच्या हाती लागले. त्यात वेगवेगळ्या वजनांचे गोल्ड क्वाईनही आहेत. या संबंधाने सीबीआयचे वरिष्ठ अधीक्षक सलीम खान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पाटील आणि राजंदेकर यांची कसून चौकशी सुरू असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.
डायरीतही दडले आहे ‘राज’
सीए हेमंत राजंदेकर यांच्या घर, तसेच कार्यालयात झडती घेतली असता सीबीआयला दोन डायऱ्या आढळल्या. त्यात अनेक सांकेतिक नोंदी आहेत. या नोंदीत अनेकांचे ‘राज’ दडले आहे. पाटील आणि राजंदेकर हे दोघे ७ मार्चपर्यंत सीबीआयच्या कोठडीत आहेत. या दोन दिवसांत अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
आरोपींची संख्या वाढणार
सीबीआयच्या हाती लागलेली कागदपत्रे आणि डायरी बरीच बोलकी आहे. त्यातून अनेकांचे व्यवहार उघड होण्याची चर्चा आहे. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यताही संबंधित सूत्रांनी वर्तविली आहे. दरम्यान, आरोपींची संख्या वाढण्याचे संकेत मिळाल्याने संबंधित वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.