मुंबई : आवड म्हणून लावलेल्या सोन्याच्या दोन दातांमुळेच एक आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याची घटना घडली. रफी किडवाई मार्ग पोलिसांनी १५ वर्षांपासून फरार असलेल्या प्रवीण आशुभा जडेजा ऊर्फ प्रवीणसिंह ऊर्फ प्रदीपसिंह आसुभा जडेजा (३८) याला बेड्या ठोकल्या. तो स्वतःची ओळख लपवून राहत होता. पोलिसांना त्याची माहिती मिळताच त्याला विम्याच्या रकमेचे आमिष दाखवून जाळ्यात ओढण्यात आले.
हिंदमाता परिसरात कपडे विक्रीचा व्यवसाय करणारे तक्रारदार ए. एच. गंगर (४०) यांच्याकडे जडेजा हा १५ वर्षांपूर्वी कामाला होता. अन्य व्यापाऱ्यांकडे उसने असलेली रक्कम गंगर यांनी प्रवीणला आणण्यासाठी पाठविले होते. त्यावेळी मिळालेल्या ४० हजार रुपयांवर त्याने डल्ला मारला. तसेच शौचालयात कोणीतरी रक्कम असलेली पिशवी चोरल्याचा बनाव रचला. याप्रकरणी रफी किडवाई मार्ग पोलिसांनी भादंवि कलम ४०८ अंतर्गत गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली होती. या गुन्ह्याच्या खटल्याच्या सुनावणीसाठी तो न्यायालयात हजर राहत नव्हता. अखेर दादर येथील न्यायालयाने त्याच्या विरोधात स्थायी अजामीनपात्र वॉरंट जारी करून त्याला फरार घोषित केले होते. गेल्या १५ वर्षांपासून जडेजा फरार होता. तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक महेश लामखडे, पोलिस हवालदार नारायण कदम, सुरेश कडलग, रवींद्र साबळे, महिला पोलिस शिपाई विद्या यादव व पोलिस शिपाई सुशांत बनकर यांनी तपासाला सुरुवात केली. जडेजाबाबत पोलिसांकडे अधिक माहिती नव्हती. फक्त आरोपीचे पुढील दोन दात सोन्याचे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी हाच धागा पकडून तपास सुरू केला.
त्याच्या आडनावावरून तो गुजरातमधील कच्छचा रहिवासी असल्याचा संशय होता. त्यामुळे पोलिसांनी हातातील माहितीच्या आधारे सर्च ऑपरेशन सुरू केले. अखेर, खबऱ्याकडून सोन्याचे दात, वयोगट, कामधंदा या गोष्टींशी मिळतीजुळती व्यक्ती तेथे असल्याचे निष्पन्न होताच पथकाने सापळा रचला. संशियाताशी संपर्क साधून विम्याचे पैसे घेण्यासाठी मुंबईत बोलावले. पैशासाठी मुंबईत येताच पथकाने त्याला ताब्यात घेतले. तेव्हा तो प्रवीण असल्याचे स्पष्ट होताच त्याला अटक करण्यात आली.
नावाची हेराफेरी-विशेष म्हणजे आरोपीने पोलिसांना चकवा देण्यासाठी प्रवीणऐवजी प्रदीपसिंह असे नाव बदलले होते. त्याने आणखीन कुणाला फसविले आहे का? याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहे.